मराठवाड्याचा शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाना तोंड देत आहे. शाश्वत सिंचनाच्या साधनांची तोकडी साधने उपलब्ध असल्याने येथील शेती मोसमी पावसावर निर्भर आहे. मात्र, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असे विसंगत हवामान अलिकडे शेतकर्यांच्या राशीला येत आहे. एकतर पेरलं जाईल का याचा भरवसा नाही, त्यात पेरलं ते उगवलं जाईल का? उगवलं ते जगेल का? जगलं ते वाढेल का? वाढलं ते पदरात पडेल का अन् पदरी पडलेलं चांगल्या भावात विकेल का? अशा विवंचनेतच येथील शेतकऱ्यांचा हंगाम मार्गस्थ झालेला असतो.
ADVERTISEMENT
वेळेवर पाऊस नाही तर रोगांचा हाहाकार
यंदा तर एकाच हंगामात विलंबाने आगमन, विसंगत व अनियमित पर्जन्यमान, त्यात पुन्हा अतिवृष्टी, पावसाच खंड, पुन्हा संततधार अशी नानारूपं पहायला मिळाली. हे काय कमी होते,ते मराठवाड्यातील प्रामुख्यानं घेतलं जाणारं प्रमुख अशा सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. उगवण, अतिवृष्टी, गोगलगाय, खोडकीड, खोडअळी, तांबेरा आदी प्रादुर्भावाचा विळखा पावसाच्या सोबतीला होताच. मागच्या 8 दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं काढणीला आलेलं पीक खराब होत असून होता तोंडाला आलेला घास पाऊस हिरावून घेत आहे. काढणी पुर्व आणि काढणीपश्चात अशी नुकसान पहावयास मिळत आहे. पावसामुळं सोयाबीनसारखं पीक एकतर नासून जातं नाहीतर काळ पडतं. काळं पड्लेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळतं. तर झाडावर असणाऱ्या पिकांना पावसामुळं तिथंच मोड फुटायला सुरु झालं आहे. म्हणून लावणीला आलेलं खर्च तरी निघेल का? या प्रश्नानं शेतकऱ्यांची घालमेल होत आहे.
मराठवाड्यात लाखो हेक्टर्सना पावसाचा फटका
मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यात पूर्वी कापूस हा पीक घेतलं जायचं. मात्र अलीकडच्या काळात अनेक भागात एकूण लागवड क्षेत्रात 60 ते 70 टक्के सोयाबीन पिकाची लागवड केली जात आहे. अनेक संकटं पार करून आलेलं पीक आता पावसाच्या पाण्यात भिजत आहे. म्हणून मराठवाड्यातील लाखो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकांना फटका बसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.
असा हा दुष्टचक्र
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीसाठी हवा तसा पाऊस सुरुवातीला पडला नाही. त्यामुळे एक महिना उशिरा पेरण्या झाल्या. त्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका बसला. त्यांतर आलेल्या पिकांवर विविध रोगं पडल्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला. अनेक भागात गोगलगाईनं सोयाबीनचं प्रचंड नुकसान केलं. मग मध्ये पाहिजे तेव्हां पावसानं पुन्हा पाठ दाखवली. या सगळ्या संकटातून काढणीला आलेलं पीक बाजारात जायच्या प्रतीक्षेत होतं. पण अवेळी आलेल्या पावसामुळं उरल्या-सुरल्या पिकाचं नुकसान झालं. हा असा दुष्टचक्र गेली अनेकवर्ष येथील शेतकरी सहन करत आहे.
8 महिन्यात 625 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या प्राप्त आकडेवारीनुसार मराठवाड्यात गेल्या 626 आत्महत्या झाल्यात. औरंगाबाद जिल्ह्यात 109, जालना 77, परभणी 50, हिंगोली 24, नांदेड 89, बीड 170, लातूर 36 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. मराठवाड्यात मागच्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून जात आहे. सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामातील पिकांना होत आहे. वेळेवर बँकेचं कर्ज मिळत नाही. पिकविम्याचा हफ्ता भरला तरी दोन- दोन वर्ष पीकविमा मिळत नाही.
अवघड आहे… नेमकं करावं तरी काय अन् जगावं तरी कसं, असा बिकट प्रश्न ज्यांचा उदरनिर्वाह निव्वळ शेतीवर निर्भर आहे अशा शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या हंगामात संकाटाची अव्याहत मालिका सुरू राहिली. पेरणी ते काढणी, एकापाठोपाठ एक समस्या. यातून आत्ता थोडाबहुत हाती पडणारा शेतमालही परतीच्या पावसाने स्वाहा केला आहे. असंख्य शेतकर्यांच्या पदरी या हंगामात उत्पादन खर्चही नाही, ही मोठी शोकांतिका आहे, असं मत गेली 25 वर्ष शेती विषयक पत्रकारिता करणारे वरिष्ठ पत्रकार बालाजी अडसूळ यांचं आहे.
ADVERTISEMENT