महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत आणि मराठी माणसाविषयी एक वक्तव्य केलं. त्यानंतर एकच गदारोळ राज्यभरात पाहण्यास मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या सगळ्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर टीकेचा भडीमार केला. यानंतर आता तीन ट्विट्स करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या ट्विट्समध्ये?
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.
कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे असे तीन ट्विट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या भाषणात काय म्हटलं होतं?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी तीन ट्विट करत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT