मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात महाविकास आघाडी सरकार चांगलंच तोंडावर आपटलं. NIA ने तपास हाती घेतल्यानंतर सचिन वाझेंचे अनेक कारनामे समोर यायला सुरुवात झाली. त्यातच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीमुळे राज्य सरकारला आणखी टीका सहन करावी लागली. अशा परिस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होत्या. अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.
ADVERTISEMENT
आपल्या राजीनाम्याच्या बातम्या निराधार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. विदर्भातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिहान प्रकल्पासंदर्भात पवार साहेबांची भेट घेतली. मागील दोन दिवसांमध्ये मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणात ATS आणि NIA ने केलेल्या तपासावर चर्चाही केली. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्या राजीनाम्याविषयी बातम्या दाखवण्यात आल्या, त्यात कोणतेही तथ्य नाही.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे NIA च्या अटकेत आहेत. वाझे यांची कस्टडी मिळाल्यानंतर NIA ने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे पुरावे शोधले आहेत. दरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS चे अधिकारी करत आहेत. सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान NIA च्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं आहे.
वाझे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची अजुन योग्य पद्धतीने चौकशी करु शकत नसल्याचं NIA ने कोर्टात सांगितलं. वाझे यांच्या चौकशीदरम्यान कोर्टाने त्यांच्या वकीलांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. परंतू वाझे यांचे वकील हजर नसल्यामुळे ते तपासात सहकार्य करत नसल्याचं NIA ने सांगितलं. ज्याला उत्तर देताना वाझे यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांच्या पथकातील एक सदस्य साजल यादव हे खास या केससाठी NIA ऑफिसजवळील हॉटेलमध्ये राहत आहेत. चौकशीदरम्यान त्यांना कधीही बोलवता येऊ शकतं, परंतू NIA ने त्यांना चौकशीदरम्यान बोलावलंच नसल्याचं सांगितलं.
दरम्यान वाझे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनीवार आज ATS ने देखील ठाणे सत्र न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं. सचिन वाझे यांची NIA कस्टडी २५ मार्चला संपते आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.
ADVERTISEMENT