दुसऱ्या लाटेत कोरोनाची तरुणांना सर्वाधिक लागण?, पाहा काय खरं काय खोटं!

मुंबई तक

• 11:58 AM • 19 Apr 2021

नवी दिल्ली: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत (Second Wave) रुग्णांची संख्याही अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून असंही म्हटलं जात होतं की, दुसऱ्या लाटेत तरुण हे सर्वाधिक कोरोना बाधित होत आहेत. (infect young people) पण आता याबाबत अत्यंत अधिकृत अशी माहिती समोर आली आहे. जी थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत (Second Wave) रुग्णांची संख्याही अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून असंही म्हटलं जात होतं की, दुसऱ्या लाटेत तरुण हे सर्वाधिक कोरोना बाधित होत आहेत. (infect young people) पण आता याबाबत अत्यंत अधिकृत अशी माहिती समोर आली आहे. जी थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. त्यामुळे याविषयी गेल्या काही दिवसांपासून जो काही भ्रम निर्माण झाला होता तो आता दूर झालेला आहे.

हे वाचलं का?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (19 एप्रिल) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये डॉ. रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल हे सहभागी झाले होते. यावेळी देशात किती टक्के तरुणांना (३० वयोगटाच्या खालील) कोरोनाची लागण झाली आहे याची आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात कोरोनाची लागण सर्वाधिक तरुणांना होत असल्याची आवई सध्या उठवली जात आहे. याबाबत निती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांनी आकेडवारी स्पष्ट केली आहे. याविषयी माहिती देताना ते असं म्हणाले की, ‘गेल्या वर्षी जी कोरोनाची लाट आली होती. त्यामध्ये तरुणांना म्हणजे 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 31 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर यावर्षी म्हणजे दुसऱ्या लाटेत हाच आकडा 32 टक्के इतका आहे. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की, गेल्या वेळेस जेवढ्या तरुणांना कोरोनाची लागण झाली होती त्याच्याच जवळपास आता देखील लागण झाली आहे. त्यामुळे फार घाबरुन जाण्याचं कारण नाही. पण तरीही तरुणांंनी पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे.’

पुढे माहिती देताना ते म्हणाले, ‘गेल्या वर्षी कोरोनाची जी लाट होती त्यात 30 ते 40 वर्षांमधील 21 टक्के जणांना लागण झाली होती. तर आता दुसऱ्या लाटेत देखील या वयोगटाली 21 टक्के लोकांनाच लागण झाली आहे.’

‘तर 40 वर्षांच्या पुढील लोकांची टक्केवारी ही गेल्यावेळेस 48 टक्के एवढी होती. ज्यामध्ये आता थोडी वाढ झाली आहे. म्हणजे आता या वयोगटातील 52 ते 53 टक्के लोक हे बाधित झाले आहेत.’ अशी माहिती व्ही.के.पॉल यांनी दिली आहे.

पाहा नेमकी आकडेवारी

1. 30 वर्षांखालील तरुण:

कोरोनाची पहिली लाट (2020)- 31 टक्के जणांना झाली होती कोरोनाची लागण

कोरोनाची दुसरी लाट (2021)- 32 टक्के जणांना झाली आहे कोरोनाची लागण

2. 30 ते 40 वयोगटातील लोक:

कोरोनाची पहिली लाट (2020)- 21 टक्के जणांना झाली होती कोरोनाची लागण

कोरोनाची दुसरी लाट (2021)- 21 टक्के जणांना झाली आहे कोरोनाची लागण

3. 40 आणि त्याच्या पुढील वयोगट:

कोरोनाची पहिली लाट (2020)- 48 टक्के जणांना झाली होती कोरोनाची लागण

कोरोनाची दुसरी लाट (2021)- 52टक्के जणांना झाली आहे कोरोनाची लागण (the second wave of corona infect young people the most see what is true and what is false)

त्यामुळे आतापर्यंत जो दावा करण्यात येत होता की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण अधिक बाधित होत आहेत तर ते काही खरं नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाचं संकट काही पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे तरुणांना याविषयीचं भान जपावंच लागणार आहे.

‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीरबाबत बोलताना नेमकी काय माहिती दिली:

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीरविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘खरं तर कोरोना या आजाराला एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण याबाबत अद्याप फार काही डेटा उपलब्ध होऊ शकलेला नाही. खरं तर या सगळ्यात रेमडेसिवीरविषयी बरीच चर्चा सुरु आहे. पण याबाबत मी स्पष्ट करु इच्छितो की, रेमडेसिवीर ही काही मॅजिक बुलेट (जादूची गोळी) नाही. आपण ते वापरतो कारण आपल्याकडे अँटी व्हायरल औषध नाही. खरं तर आपण चांगलं अँटी व्हायरल औषध शोधण्यात कोणतीही मोठी प्रगती केलेली नाही.’

‘रेमडेसिवीर हे औषध कोणाला आणि कोणत्या परिस्थितीत दिलं गेलं पाहिजे याला फार महत्त्व आहे. खरं तर जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि ज्यांचा ऑक्सिजनची पातळी ही कमी झालेली आहे अशा लोकांना रेमडेसिवीर दिलं गेलं पाहिजे. रेमडेसिवीर हे रुग्णाला खूप आधी किंवा खूप नंतर देऊन देखील फायदा नाही. रुग्णाला ते 5व्या किंवा 7व्या दिवशी दिलं जावं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. रेमडेसिवीरने मृत्यूदर कमी होतो असं अद्याप तरी कोणत्या संशोधनातून आढळून आलेलं नाही.’ असं ते म्हणाले आहेत.

    follow whatsapp