Eknath Shinde: “बाळासाहेबांची शिवसेना नावाबाबत आम्ही समाधानी, धनुष्यबाण मिळायला हवा होता..”

मुंबई तक

11 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:47 AM)

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका मिळाल्यानेच आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या नावावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निवडणूक आयोगाचे त्यांनी आभारही मानले आहेत. एवढंच नाही तर ठाकरे गटाला जे नाव मिळालं आणि चिन्ह मिळालं त्याबाबत त्यांनी टीकाही केली आहे. काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे? ठाकरे गटाला मशाल चिन्ह […]

Mumbaitak
follow google news

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका मिळाल्यानेच आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या नावावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निवडणूक आयोगाचे त्यांनी आभारही मानले आहेत. एवढंच नाही तर ठाकरे गटाला जे नाव मिळालं आणि चिन्ह मिळालं त्याबाबत त्यांनी टीकाही केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?

ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे. मशाली अन्यायाच्या विरोधात पेटवल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांनीही अन्यायाविरोधात मशाली पेटवल्या होत्या. आम्हीही पाहू हे (ठाकरे गट) अन्यायाविरोधात मशाली पेटवतात का? एवढंच नाही तर अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवू असंही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांकडे स्पष्ट केलं.

धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने व्यक्त केली खंत

निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण चिन्ह मागितलं होतं, मात्र ते चिन्ह मिळालं नाही. ही आमच्यासाठी एक दुःखद घटना आहे. कारण शेवटी निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत जे निर्णय मेरीटवर घेतले ते पाहिले असता धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असं आम्हाला वाटलं होतं. ज्या पक्षाकडे विधीमंडळात बहुमत असतं आणि संघटनात्मक बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं. चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभा या ठिकाणी ७० टक्के बहुमत आहे. त्यापेक्षा जास्तही बहुमताची आकडेवारी आमच्याकडे आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी याबाबत काहीशी खंत व्यक्त केली.

हजारो, शेकडो लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने

हजारो, शेकडो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्ते सगळे आमच्या बाजूने आहेत. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. भरघोस पाठिंबा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असतानाही धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं नाही हा आमच्यावरचा अन्याय आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जे मेरीट निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या प्रकरणात लावलं होतं तेच मेरीट आमच्याबाबतही लावायला हवं होतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात धनुष्यबाणावर दावा करणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी, “आमचा दावा पेंडींग आहे. ऑन मेरीट आमचा दावा प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने इतर जे निर्णय घेतले आहेत. तसंच हे प्रकरण आहे. आमच्याकडे ७० टक्के बहुमत आहे. संस्थांत्मक संख्याबळही आमच्याकडे अधिक आहे”, असं उत्तर दिलं. तसेच, “इतर राज्यातील लोक आमच्याकडे आहे. त्यामुळे मेरीटवर त्यांना (निवडणूक आयोगाला) धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल असंही शिंदे यांनी म्हटलं.

    follow whatsapp