स्वाती चिखलीकर, सांगली
ADVERTISEMENT
सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथील वसंतनगरमध्ये धारधार शस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांची हत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या झालेल्यांची नावे आहे. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, हल्लेखोर फरार झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या एका व्यक्तीशी हल्लेखोरांचा एक जुना वाद होता. त्याप्रकरणी पूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच पूर्व वैमनस्यातून 1 ऑगस्ट रोजी रात्रीही वाद झाला होता. पोलिसांनी हा वाद मिटवला होता. मात्र, तरीही आज विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेत स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर सध्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, एकाच वेळी झालेल्या तीन जणांच्या हत्येने दुधोंडी गावात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे. यामुळे सध्या इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हल्लोखोर आणि मृत हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचीही माहिती समोर आली आहे. एका जुन्या प्रकरणावरुन दोन्ही गटांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. मात्र, 1 ऑगस्ट रोजी हल्लेखोर प्रविण मोहितेसह सात ते आठ जणांनी अचानक सनी मोहिते यांच्यावर हल्ला चढवला.
Crime: गुपचूप घरात शिरुन धारदार शस्त्राने वार, मित्राच्या बायकोची अवघ्या काही क्षणात निर्घृण हत्या
हा हल्ला एवढा भीषण होता की, ज्यामध्ये तिघांची जागीच हत्या करण्यात आली. ज्यात चाकू आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. तब्बल तासभर हा संपूर्ण प्रकार सुरु होता. यावेळी अनेक दुचाकी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना शोधण्यासाठी कसून प्रयत्न देखील सुरु केले आहेत. मात्र, अद्याप तरी पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे आता वेगवेगळी पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहे. तसंच गावातील वातावरण अधिक चिघळू नये यासाठी देखील पोलिसांनी आता चोख बंदोबस्त ठेवला आहे.
ADVERTISEMENT