कोल्हापूरची धाडसी गिरीकन्या खुशी कांबोजसह मुलींच्या टीमनं १८०० फुट उभ्या कोकण कड्यावर यशस्वी चढाई करत हा कडा सर केला. खुशी आणि तिच्यासोबतच्या मुलींनी हा कडा सर केल्याने त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.
ADVERTISEMENT
कोल्हापुरची गुणवंत गिरीकन्या खुशी कांबोजने एका पाठोपाठ एक कडे पार करत , आकांक्षापुढती गगनही ठेंगणे ही उक्ती सार्थ करून दाखवली आहे . जिथं अनेक नामवंत आणि दिग्गज गिर्यारोहकसुध्दा अनेकदा विचार करतात अशा १८०० फुट उभ्या कोकण कड्यावर खुशीनं यशस्वी चढाई करून तिच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवलाय . भारतात पहिल्यांदाच कोकण कड्याची कातळ भिंत मुलींच्या टीमनं पार केलीय .
कोल्हापूरचे प्रसिद्ध गिर्यारोहक विनोद कांबोज यांची कन्या खुशीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. एका पाठोपाठ एक डोंगरकडे यशस्वीरित्या सर करण्याचा सपाटाच जणू तिने लावलाय . तिनं अरमान या मैत्रीणीसोबत कोकण कड्यावर चढाई करण्याचा संकल्प सोडला होता . कोकण कडा म्हणजे हरिश्चंद्र गडाचं मुख्य आकर्षण आहे. अजस्र आणि रौद्र अशा कोकण कडयानं भल्याभल्यांच्या काळजात पाहता क्षणी धडकी भरते. त्यामुळं अनेक गिर्यारोहक कोकण कड्यावर चढाई करण्याची हिंमत दाखवत नाहीत.
अशात कोकण कडा चढाईचं अत्यंत खडतर आव्हान तेही मुलींनी स्वीकारणं ही प्रचंड आव्हानात्मक बाब होती. मात्र फेब्रुवारीपासूनच खुशी आणि अरमान या विशीतल्या तरूणींनी त्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली होती. रोजच्या सरावाबरोबरच ओव्हरहँगवरील क्लाईबिंगची प्रॅक्टिस हा कळीचा मुद्दा होता. त्यामुळं प्रथम सरावासाठी या दोघींनी भैरवगडची भिंत आणि नाण्याचा अंगठा या मोहिम केल्या . तसंच डेला अॅडव्हेंचर पार्कमधील भिंतीवर चढाई करण्याचा तीन आठवडे सराव केला . तीन महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून या दोघींनी ४ मे रोजी कोकण कड्याच्या पायथ्याशी बेस कॅम्प सज्ज केला. ६ मे रोजी या कठीण चढाईच्या मोहिमेची सुरूवात खुशी आणि अरमाननं केली . पहिल्या दिवशी १ हजार फुटांची चढाई केल्यानंतर , तांत्रिक अडचणीमुळं एक दिवस मागे येवून पुन्हा ८ मे रोजी या दोघींनी चढाईला सुरूवात केली .
या चढाई दरम्यान खुशी २० फूट खाली कोसळली . मात्र अरमाननं सुरक्षा देवून तिला स्थिर केलं. त्यानंतर पाली कड्यावर लटकतच एक रात्र काढून ९ मे रोजी पुन्हा चढाई सुरू केली आणि १० मे रोजी २ वाजून २० मिनिटांनी खुशीनं तर ४ वाजून ४० मिनिटांनी अरमाननं कोकण कडयावर पाऊल ठेवलं आणि उपस्थित सर्वांनी जल्लोष केला.
संपूर्ण भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या मुलींच्या टीमनं १८०० फुटांचा सुळका पार करण्याचा इतिहास यानिमित्तानं रचला गेला . करवीर कन्या कस्तुरी सावेकरनं एव्हरेस्ट शिखर पार केल्यानंतर खुशी कांबोज आणि अरमान मुजावरनं अत्यंत कठीण आणि अवघड असा कोकण कड़ा पार करत , कोल्हापूरच्या पोरी जगात भारी हे दाखवून दिलं आहे.
ADVERTISEMENT