राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या बेपत्ता आहेत. परमबीर सिंह परदेशात फरार झाल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांचं नाव न घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. ‘आमच्याकडे तक्रारदार गायब आहेत, तरीही प्रकरण सुरू आहे’, असं म्हणत ठाकरे यांनी टोला लगावला.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘किरणजी आपण बरोबर बोललात… भूमिपूजनावेळी मी नव्हतो, पण झेंडा रोवायला मी आलो. हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. या इमारतीबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. ही इमारत पाहिल्यानंतर मला असं वाटतं की, इमारत बघण्यासाठीही लोकं आली पाहिजे’, असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं.
‘न्यायादानाची प्रक्रिया आता गतिमान होऊ लागली आहे. ती आणखी गतिमान होण्यासाठी सरकार म्हणून जे काही करणं शक्य आहे. ते आम्ही करू असं वचन मी आज देतो. अनेकदा न्यायालयात जाण्यात आयुष्य निघून जातं. खर्च परवडत नाही. इथे उल्लेख करण्यात आला की, १९५८ सालापासून एक आरोपी फरार आहे. चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीपण केस सुरु आहे. आरोप करून पळून गेला. कुठे गेला कुणालाच माहिती नाही’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत परमबीर सिंह यांच्या प्रकरणाचा दाखला दिला.
‘आरोप केला त्यामुळे चौकश्या सुरू आहे. उत्खनन केलं जातंय. धाडसत्र सुरू आहे. पण ही जी काही पद्धत आहे, त्याला चौकट आणण्याची गरज आहे. न्यायदान एकट्या जबाबदारी नाही, हे खरं आहे. न्यायदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे टीमवर्क आहे आणि देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आपली आहे’, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
‘आपण जे म्हणतो कार्यकारी यंत्रणा, कायदेमंडळ, न्यायपालिका आणि चौथा स्तंभ प्रसार माध्यमं. या चारही स्तंभांना लोकशाही पेलण्याचं हे कर्तव्य करायचं आहे. हा लोकशाहीचा गोवर्धन आहे. या चारही स्तंभावर दबाब आहे. या व्यतिरिक्त कोणताही दबाब नाही. मला नाही वाटत की, कुठल्या दबावाने हे स्तंभ कोलमडून पडतील. पण, यातील एक जरी स्तंभ कोसळला, तर अख्ख लोकशाहीचं छत कोसळून पडेल. मग कितीही खांब लावले तरी ते उभं करता येणार नाही’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT