Uddhav Thackeray: “…तर 2024 साली भाजपला पाणी पाजणे शक्य”, ठाकरेंचा इशारा

मुंबई तक

• 09:37 PM • 21 Feb 2023

Uddhav Thackeray Appeals To opposition regional party leaders: बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार यांनी काँग्रेसला आवाहन करताना विरोधकांच्या एकजुटीबद्दल भूमिका मांडली. नितीश कुमारांच्या भूमिकेचं स्वागत करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव यांना खडेबोल सुनावत विरोधकांना एकीचं आवाहन केलं आहे. विरोधक एकत्र आले नाही, तर […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray Appeals To opposition regional party leaders: बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार यांनी काँग्रेसला आवाहन करताना विरोधकांच्या एकजुटीबद्दल भूमिका मांडली. नितीश कुमारांच्या भूमिकेचं स्वागत करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव यांना खडेबोल सुनावत विरोधकांना एकीचं आवाहन केलं आहे. विरोधक एकत्र आले नाही, तर होऊ घातलेल्या राजकीय बदलांबद्दल ठाकरेंनी इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून काँग्रेस नेतृत्वाखाली विरोधकांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे. ठाकरे म्हणतात, “देशातील लोकशाही वधस्तंभाकडे ढकलली जात आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसला केलेले आवाहन महत्त्वाचे आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कुमारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

“काँग्रेसने विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा. हे ऐक्य नीट झाले तर भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत ‘100’ मध्येच ‘ऑल आऊट’ करू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला. कुमारांचे असेही म्हणणे आहे की, विरोधकांच्या आघाड्या कितीही होत असल्या तरी काँग्रेसशिवाय विरोधी ऐक्य शक्य नाही. नितीश कुमार यांनी सत्य तेच सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाशी लढणे हे मोदी-शहांच्या अतिरेकी हुकूमशाही प्रवृत्तीशी लढण्यासारखे आहे”, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Thackeray कडून मशालही काढून घेण्याची तयारी, ‘या’ पक्षाची थेट शिंदेंकडे धाव

“प. बंगालात ममता बॅनर्जी, तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव हे भाजपशी लढण्यासाठी स्वतंत्र चुली मांडून बसले आहेत, पण अशा चुलींना अर्थ नाही. काँग्रेसचा द्वेष करून भाजपच्या विद्यमान हुकूमशाहीशी कसे लढणार? हे कोडे आधी सोडवायला हवे. प्रत्येकाला भाजपविरुद्ध लढायचेच आहे, पण सध्याच्या भाजपशी स्वतंत्र चुली व संसार मांडून लढता येणार नाही. विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाल्याशिवाय लढणे शक्य नाही”, असं म्हणत ठाकरेंनी ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोदींना वारंवार पाणी प्यावे लागले -उद्धव ठाकरे

“2024 साठी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ते नंतर ठरवता येईल, पण आधी एका टेबलावर बसून चर्चा होणे गरजेचे आहे व त्याचसाठी काँग्रेसनेही पुढाकार घ्यायला हरकत नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व ‘भारत जोडो’ यात्रेने भक्कम व प्रगल्भ केले आहे. त्यांनी संपूर्ण देश पायी पालथा घातला व त्यानंतरच्या संसद अधिवेशनात हिंडेनबर्ग व मोदी-अदानी दोस्ती प्रकरणात जोरदार हल्ला करून मोदींचे वस्त्रहरण केले. मोदी उत्तर देऊ शकले नाहीत व भाषण करताना त्यांचा घसा कोरडा पडत होता. वारंवार पाणी प्यावे लागत होते. याचा अर्थ असा की, विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला पाणी पाजणे सहज शक्य आहे”, असा सल्ला देत ठाकरेंनी विरोधकांना एकीचं आवाहन केलं आहे.

राज्यपालांनी सरकार पाडायला मदत केली? सिब्बलांचं कोर्टात कोश्यारींकडे बोट

Uddhav Thackeray : नितीश कुमारांच्या भूमिकेचं ठाकरेंकडून समर्थन

“नितीश कुमार यांचे म्हणणे असे की, ‘पंतप्रधान पदाचा उमेदवार काँग्रेसलाच नक्की करू द्या. माझ्या नावाची काही लोक चर्चा करतात, पण माझीच इच्छा नाही. जास्तीत जास्त विरोधकांनी एकत्र यावे व रणनीती तयार करावी तरच फायदा होईल.’ नितीश यांच्या या आवाहनावर आता काँग्रेसने पुढे यायला हवे. लोकसभा निवडणुकीस आता जेमतेम एक वर्षाचा काळ उरला आहे व हा काळ देशाचे भविष्य ठरविण्याचा आहे. देशात एक प्रकारची मनमानी सुरू आहे”, अशी टीका ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर केली आहे.

“फोडा, झोडा आणि राज्य करा व त्यासाठी निवडणूक आयोगापासून न्यायालये, तपास यंत्रणांचा मुक्त गैरवापर करा असे धोरण अवलंबले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडली व फुटीर गटास खरी शिवसेना ठरवून त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह विकत दिले. पक्षांतर्गत झगड्यात एक तर चिन्ह गोठवले जाते किंवा मूळ पक्षाकडेच ठेवले जाते. इकडे फुटिरांनी ते विकत घेतले, असे स्पष्ट दिसते”, ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Eknath Shinde शिवसेनेचे नवे ‘बॉस’; पहिल्या कार्यकारिणीमध्ये घेतले मोठे निर्णय

“बिहारात नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला व आता उपेंद्र कुशवाह यांना महाराष्ट्रातील मिंध्यांप्रमाणे फोडण्यात आले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील, महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस पुढारी भाजपने होलसेलात विकत घेतले. गुजरातमध्येही हार्दिक पटेलसह अनेक तरुण पुढारी त्यांनी फोडले. आजची भाजप ही कालची काँग्रेस बनली आहे. त्या पक्षाचा मूळ विचार, संस्कार व संस्कृती त्यामुळे बाराच्या भावात गेली. पैसा व सत्तेचा माज हीच सध्याच्या राज्यकर्त्यांची राजकीय शस्त्र बनली असून विरोध करणाऱ्यांची डोकी उडवायची हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे”, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला.

विरोधकांचे आक्रंदन कुचकामी ठरेल; ठाकरेंनी दिला इशारा

“निवडणूक प्रक्रिया संशयास्पद बनली आहे. ‘ईव्हीएम’ घोटाळा करण्यासाठी इस्रायलच्या ‘टीम जॉर्ज’ कंपनीस ठेका दिल्याचा गौप्यस्फोट झालाच आहे. अशा वेळी विरोधकांनी आपले अहंकार बाजूला ठेवून देश तसेच लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र यायला हवे. विरोधी ऐक्याचा तिढा लवकरात लवकर सुटायलाच हवा. राज्याराज्यांत भाजपविरोधात संताप आहे. एक प्रकारची चीड आहे. भंपक राष्ट्रवाद व धर्मांधतेचे जहर फैलावून निवडणुका जिंकणाऱयांच्या विरोधात समस्त विरोधी पक्षांनी एकत्र येणे हेच भाजपच्या भंपक देशभक्तीला उत्तर ठरेल! नाही तर विरोधकांचे आक्रंदन कुचकामी ठरल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा ठाकरेंनी विरोधी दलांना दिला आहे.

    follow whatsapp