ठाणे: राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता काल (12 फेब्रुवारी) पुन्हा एकदा अशाच स्वरुपाची धमकी त्यांना देण्यात आल्याने तपास यंत्रणा अर्लट झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री पद स्वीकारून एकनाथ शिंदे यांनी मोठे धाडस दाखवले होते. या भागाचा विकास कसा होईल यासाठी एकनाथ शिंदे हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अतिशय दुर्गम असलेला हा भाग नक्षली चळवळीसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु या भागाचा विकास करण्याचा ध्यास घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाची अनेक कामे हाती घेतली.
येथील युवकांना रोजगार मिळाला तर त्यांची भटकलेली पाऊले पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गाकडे वळतील असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी वारंवार म्हटलं आहे. मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्याचा आपला मानस देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.
काल मिळालेल्या धमकीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आपल्याला याआधी देखील अशा प्रकारच्या धमक्या आल्या असून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मला धमकी देणाऱ्यांनी काय करावे हा त्यांचा विषय असून आपण विकासाचे काम असेच सुरु ठेऊ.’ असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
Gadchiroli Encounter : “मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानं नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का”
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देखील एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. मात्र, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्याने राज्याच्या गृह खात्याने एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना सातत्याने मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेता लवकरच त्यांच्या सुरक्षा ताफ्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT