वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या गेटवरच एक महिला नमाज अदा करण्यासाठी बसली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि या महिलेला उठवलं. तसंच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक ४ वर ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
सध्या नमाज विरूद्ध हनुमान चालीसा असा वाद महाराष्ट्रात रंगला आहे. अशात देशभरातही काही अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. ही महिला बराच वेळ काशी विश्वेवर मंदिराच्या बाहेर बसून नमाज अदा करत होती. पोलिसांनी वाट पाहिली आणि मग तिला उठवलं. या घटनेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसंच इथलं वातावरणही शांत आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक चारच्या बाहेर ही महिला नमाज अदा करत होती. या महिलेचं नाव आइसा असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वाराणसीतल्या जैतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही महिला राहते. या महिलेला नमाज अदा करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही महिला मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब ही आहे की ज्ञानवापी या ठिकाणी जी मशीद आहे त्या मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहिले आहेत. ज्ञानवापी येथील मशिदीत बरीच गर्दी झाल्याने अनेकांना घरीही जावं लागलं आहे. आज तकशी बोलताना लोकांनी सांगितलं की एवढी गर्दी आम्ही आजपर्यंत पाहिलेली नाही. मंदिर आणि मशीद यांच्याबाबत जो सर्वे सुरू आहे त्यामुळे ही गर्दी झाली असावी असंही सांगितलं जातं आहे.
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद या दोहोंना सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मंदिरात किती गर्दी होते आणि मशिदीत किती लोक येतात याचा सर्वे केला जाणार आहे त्यामुळे ही गर्दी झाली असावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.
या प्रक्रियेत हिंदू पक्षाकडून १५ लोक असणार आहेत. तसंच कोर्ट कमिश्नर यांचं पथक आणि ३ फोटो, व्हीडिओग्राफरही असणार आहेत. मुस्लिम पक्षाच्या वतीने पाच वकील आणि अंजुमन इंतामियां मशीद कमिटीचे सदस्यही या ठिकाणी येणार आहेत.
ADVERTISEMENT