ज्येष्ठ वगसम्राज्ञी, लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन

मुंबई तक

• 03:42 PM • 25 May 2021

ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वी कांताबाई यांना कोरोनाची लागण झाली होती. संगमनेरमध्ये कांताबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडेकर यांच्या त्या आई आहेत. दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. […]

Mumbaitak
follow google news

ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वी कांताबाई यांना कोरोनाची लागण झाली होती. संगमनेरमध्ये कांताबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडेकर यांच्या त्या आई आहेत.

हे वाचलं का?

दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. त्यांचे वडील गुजरातमधून मूळगावी साताऱ्याला आले. तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या. साताऱ्यातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या. त्यातूनच त्यांचा नृत्य आणि तमाशाकडे कल वाढला. पुढे साताऱ्यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं. बघता बघता कांताबाई सातारकर हे नाव गाजू लागलं.

आयुष्यात जे काही करायचे ते भव्यदिव्य करायचे हे स्वप्न घेऊन १९५३ च्या सुमारास एकटीने मुंबई गाठली. पण फक्त एक दिवस दादू इंदुरीकर यांच्या तमाशात काम करून नंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी मिळाली. कांताबाई आणि खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा.

त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारी एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.

    follow whatsapp