वर्धा अपघात: वाढदिवस साजरा करायला गेले होते सात विद्यार्थी, परतत असताना मृत्यूने कवटाळलं!

मुंबई तक

• 05:30 AM • 25 Jan 2022

मंगळवारी सकाळी वर्ध्याच्या अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली. सोमवारी रात्री उशिरा एका SUV कारचा पुलावरून पडून भीषण अपघात झाला. या अपघातात मेडिकलला असलेले सात विद्यार्थी ठार झाले आहेत. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला गेलेल्या या सात जणांना पुसटशीही कल्पना नव्हती की येताना आपल्यापैकी कुणीही जिवंत नसणार. वर्धा अपघाताचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आता समोर आला आहे. पवन […]

Mumbaitak
follow google news

मंगळवारी सकाळी वर्ध्याच्या अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली. सोमवारी रात्री उशिरा एका SUV कारचा पुलावरून पडून भीषण अपघात झाला. या अपघातात मेडिकलला असलेले सात विद्यार्थी ठार झाले आहेत. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला गेलेल्या या सात जणांना पुसटशीही कल्पना नव्हती की येताना आपल्यापैकी कुणीही जिवंत नसणार. वर्धा अपघाताचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आता समोर आला आहे.

हे वाचलं का?

पवन शक्ती या विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेडिकलचे हे सात विद्यार्थी महिंद्रा एसयूव्हीने निघाले. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर हे सगळे परतत होते आणि त्याचवेळी ही कार चाळीस फूट खोल नदीत पडली. या कारमधले सातही जण जागीच ठार झाले. नदीत कोसळलेली ही कार आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार-ते पाच तास लागले.

नीरज चौहान, अविष्कार रहांगदळे, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघांची नावं आहेत. पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला गेलेले हे सगळेजण परतलेच नाहीत.

अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री दहा वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने आपण बाहेर आलो असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळवलं होतं.

फोनवरुन सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलं होतं. रात्री दहा वाजता हॉस्टेल विद्यार्थी न आल्यामुळे हॉस्टेलमधील वरिष्ठांनाही काळजी लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्यानं सर्वच चिंतित होते. अखेर पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यू बातमी येऊन धडकल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगदळे यांचे सुपुत्र आविष्कार रहांगदळे याचाही या अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना शोककळा पसरली आहे. अपघातातील फक्त एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर एक विद्यार्थी हा ओदिशाचा होता.

सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे.

    follow whatsapp