नितीन शिंदे
ADVERTISEMENT
पंढरपूर: संयम म्हणजे काय? तर याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वारकरी (Warkari) असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपली संयमी वृत्ती हीच वारकरी संप्रदायाची खरी ओळख आहे. याच गोष्टीचा आज पुन्हा प्रत्यय आला आहे. विठुरायाचं (Vitthal) डोळाभरुन दर्शन घेणं आणि त्याच्या चरणी लीन होणं हेच प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. पण सध्या कोरोनाच्या काळात घरातच राहून आपल्या विठुराया चरणी लीन होऊन वारकऱ्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला आणि जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, उत्तराखंडमधील कुंभमेळ्यात (Kumbh Mela) लाखोंची गर्दी होती आणि त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागणही झाली आहे. पण असं असताना महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून जो संयम दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही.
पंढरपूरमध्ये (Pandharpur) दरवर्षी प्रमुख चार वाऱ्या असतात. यातील एक वारी म्हणजे चैत्र वारी. या वारीला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला हजेरी लावतात. मात्र यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्याने ही वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात आली आहे. यावेळी वारकऱ्यांना सलग चौथी वारी आपल्या लाडक्या विठुमाऊलीच्या दर्शनाविना साजरी करावी लागली आहे.
आज चैत्र वारी.. शुध्द कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेची नित्यपूजा पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात द्राक्ष व द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीसाठी तब्बल 700 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला होता. एकीकडे द्राक्षांच्या आरासाने मंदिरात सुंदर सजावट केली असली तरी भाविकांविना मंदिर रिक्तच होतं.
गेल्या वर्षभरापासून भाविकांना मनाप्रमाणं वारी करता आलेली नाहीए. त्यामुळे पंढरपूर नगरीतील प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, नामदेव पायरी महाद्वार या सगळ्या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे. यावेळी फक्त एक प्रतिकात्मक वारी काढण्यात आली होती. ती देखील प्रशासनाच्या परवानगीनेच. त्यामुळे पंढरपुरात ना हरी नामाचा जयघोष ना टाळ मृदुंगाचा खणखणाट.. फक्त आणि फक्त होती निरव शांतता. पण या शांततेही आस होती ती विठुरायाच्या भेटीची…
एकीकडे निवडणुकीसाठी जमा झालेली हजारोंची गर्दी, तर दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी जमलेला लाखोंचा समुदाय आणि यामुळे पसरलेला कोरोना.. यासारखी अनेक उदाहरणं आपण पाहत आहोत. असं असताना वारकऱ्यांनी मात्र चारीही वाऱ्यांविषयी कोणतीही आडमुठी भूमिका न घेता सर्वांच्या आरोग्यासाठी आपल्या भावनांवर लगाम ठेवत संपूर्ण देशाला एक आदर्श शिकवण देण्याचं काम केलं आहे. अशा या वारकऱ्यांसमोर अवघा महाराष्ट्र आज नतमस्तक आहे. (warkaris showed great restraint on chaitra wari without crowding in pandharpur)
ADVERTISEMENT