Modi Cabinet Reshuffle: Narayan Rane यांच्यासह Maharashtra मधील मंत्र्यांना मोदींनी कोणती खाती दिली?

मुंबई तक

• 07:21 PM • 07 Jul 2021

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet reshuffle) पार पडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खाते वाटपात मोठे बदल केले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) जे चार मंत्री (Minister) आता केंद्रात गेले आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मंत्रिमंडळात पूर्वीपासून जे महाराष्ट्रातील मंत्री आहेत त्यांना नेमकं […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet reshuffle) पार पडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खाते वाटपात मोठे बदल केले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) जे चार मंत्री (Minister) आता केंद्रात गेले आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मंत्रिमंडळात पूर्वीपासून जे महाराष्ट्रातील मंत्री आहेत त्यांना नेमकं काय मिळालं यावरही आपण एक नजर टाकणार आहोत.

हे वाचलं का?

मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान महाराष्ट्रातून नारायण राणे, (Narayan Rane) भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांना पसंती देण्यात आली. जाणून घेऊयात या मंत्र्यांना मंत्रिमंडळात नेमकी कोणती खाती मिळाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होणार.

नारायण राणे: मंत्रिमंडळ विस्तार जे नाव सर्वाधिक चर्चेत होतं ते म्हणजे नारायण राणे यांचं. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्री पद यावेळी देण्यात आलं आहे.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तेव्हा नारायण राणे हे शिवसेनेत होते. पण नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2018 साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि स्वत:चा स्वाभिमानी पक्ष स्थापन केला होता. पण 2019 मध्ये त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन करुन टाकला.

भागवत कराड: मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असताना भागवत कराड हे नाव चर्चेत देखील नव्हतं. मात्र अचानक केंद्रीय नेतृत्वाने या नावाला पसंती दिली. त्यातही भागवत कराड यांना अत्यंत महत्त्वाचं असं अर्थ खात्याचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे.

भागवत कराड हे वंजारी समाजाचं म्हणजेच ओबीसींचं प्रतिनिधीत्व करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिली गेलं असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र असं असलं तरीही कराड हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

डॉ. भारती पवार: केंद्रीय मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रातून आश्चर्यकारकरित्या जे नाव समोर आलं ते होतं. खासदार भारती पवार यांचं. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या भारती पवार यांनी 2019 साली थेट भाजपमध्ये प्रवेश करुन दणदणीत विजयही मिळवला होता.

पण भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण याशिवाय आता त्यांना आरोग्य मंत्रालयाचं राज्यमंत्री देखील करण्यात आलं आहे. सध्या हे खातं खूपच महत्त्वाचं समजलं जात आहे.

कपिल पाटील: 2014 साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले कपिल पाटील यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडली आहे. त्यांना पंचायत राज मंत्रालयाचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे.

नव्याने समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना बऱ्यापैकी खाती देण्यात आली आहेत. आता आपण एक नजर टाकूयात महाराष्ट्रातील जे मंत्री आधीपासूनच मंत्रिमंडळात आहेत त्यांच्या खातेवाटपावर

नितीन गडकरी: मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे खाते वाटप करण्यात आलं त्यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे असणारं सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खातं काढून घेण्यात आलं आहे. जे नारायण राणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे गडकरींचे पंख कापण्याचे काम केलं आहे. पण असं असलं तरीही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय त्यांच्याकडे कायम आहे.

पियुष गोयल: महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका हा पियुष गोयल यांच्या खात्याबाबत बसला आहे. कारण पियुष गोयल यांच्याकडे असणारं रेल्वे खातं हे काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे हे खात अश्विनी वैष्णव यांना देण्यात आलं आहे. पण याऐवजी पियुष गोयल यांना वस्त्रोद्योग खातं देण्यात आलं आहे. पण ज्या पद्धतीने रेल्वे खातं गोयल यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे ते पाहता महाराष्ट्राच्या वाट्याचं मोठं मंत्रालय गमावावं लागलं आहे.

रावसाहेब दानवे: मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान अशा वावड्या उठल्या होत्या की, रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. पण असं काहीही झालेलं नाही. किंबहुना दानवे यांना रेल्वे, कोळसा आणि खाण यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

रामदास आठवले: भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे खासदार रामदास आठवले यांचं मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे सुरुवातीपासून सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री पदाची जी जबाबदारी देण्यात आली आहे ती कायम ठेवण्यात आली आहे.

PM Modi Cabinet Expansion 2021: मोदींकडून धक्कातंत्राचा वापर, खातेवाटप जाहीर; पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील दोन मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर:

केंद्रीय मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे.

प्रकाश जावडेकर – केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला हे मात्र अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.

संजय धोत्रे – महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांना देखील मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला आहे. शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे ते राज्यमंत्री होते.

    follow whatsapp