रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. आमदार साळवींना शनिवारी रायगड लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. यात सोमवारी (5 डिसेंबर) रोजी मालमत्ता चौकशीसाठी सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश या नोटीसीमधून देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, या नोटिसीनंतर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आहे. त्यामुळेच मला एससीबीची नोटीस प्राप्त झाली आहे. देशात, राज्यात एकाच पक्षाचं सरकार, त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणा आणि राज्य यंत्रणाच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. पण भ्रष्टाराचे आरोप, बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेले देखील भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात.
होय, मी श्रीमंत आहे…
आमदार साळवी म्हणाले, होय मी श्रीमंत आहे, बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या पाठीवर थाप मारली ही श्रीमंती आहे, शिवसैनिक म्हणून माझी संपत्ती आहे. असंही साळवी यांनी स्पष्ट केलं. तसंच मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नये, जनतेच्या हितासाठी तुरुंगवास भोगला आहे. मी निर्दोष आणि स्वच्छ आहे. चौकशीची नोटीस आली आहे, त्यामुळे त्याला सामोरं जाणार असल्याचही त्यांनी सांगितलं.
मी शिवसेनेतच राहणार…
दरम्यान, नोटीस आली, तुरुंगात गेलो तरीही आपण शिवसेनेतच राहणार असल्याचं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, हिंमत असेल तर मला जेल मध्ये टाकून दाखवा, संपुर्ण शिवसेना माझ्या पाठिशी आहे. जेलमध्ये गेलो तरी बेहत्तर, पण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे. मी शिंदे गटात जाणार नाही. हे प्रकरण काय आहे ते मला माहित नाही. पण न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे. माझा आत्मविश्वास ठाम आहे, कोणत्याही यंत्रणेला घाबरत नाही, असंही साळवी यांनी बोलून दाखवलं.
उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं?
यावेळी साळवी यांनी नोटीस आल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्याशीही बोललो असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, नोटीस प्राप्त झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की राजन तुझ्या पाठीशी शिवसेना आहे, निश्चिंत रहा. तर तुरुंगामध्ये जाईन पण मरेपर्यंत पायाशी जाणार नाही, मरेपर्यंत उद्दव ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार असं साळवी यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT