वाझे प्रकरणी राणेंनी सनसनाटी आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

मुंबई तक

• 03:32 PM • 15 Mar 2021

मनसुख हिरेन प्रकरणात भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझेंनी गेल्या वर्षी आयपीएलच्या बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली. वरुण सरदेसाईंनी सचिन वाझेंना फोन करुन तुम्ही मागितलेल्या पैशांमध्ये आमचा वाटा किती अशी […]

Mumbaitak
follow google news

मनसुख हिरेन प्रकरणात भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले.

हे वाचलं का?

सचिन वाझेंनी गेल्या वर्षी आयपीएलच्या बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली. वरुण सरदेसाईंनी सचिन वाझेंना फोन करुन तुम्ही मागितलेल्या पैशांमध्ये आमचा वाटा किती अशी विचारणा केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.

‘बेछूट आरोपांप्रकरणी नितेश राणेंवर अब्रू नुकसानीचा दावा करणार’

नितेश राणे यांनी केलेले आरोप निराधार असून, आरोप सिद्ध करा नाहीतर कारवाईला तयार रहा, असा इशारा सरदेसाईंनी दिलाय. सरदेसाईंनी आपण नितेश राणे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

त्यामुळे नितेश राणे यांनी आरोप केल्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे वरुण सरदेसाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे

कोण आहेत, वरुण सरदेसाई?

राहुल कनल, पूर्वेश सरनाईक, अमेय घोले ही आदित्य ठाकरे यांच्या खूप जवळची, इंटर्नल वर्तुळातली माणसं म्हणून ओळखली जातात. या वर्तुळातही एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे वरुण सरदेसाई यांचं.

वरुण यांनी अमेरिकेतल्या कोलंबिया युनिवर्सिटीतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलीय. २८ वर्षांचे सरदेसाई हे कॅबिनेटमंत्री आदित्य यांचे मावस भाऊ आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या बहीणाचा हा मुलगा आहे. गेल्या काही वर्षांपासून वरुण हे आदित्य यांच्यासोबत अगदी सावलीसारखं दिसतात.

आदित्य यांच्या जवळीकीसोबतच त्यांनी राजकारणातही चंचूप्रवेश केलाय. आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेतही अत्यंत महत्त्वाच्या सरचिटणीस पदावर ते कार्यरत आहेत. २०१९ च्या निवडणुकीआधी आदित्य यांना लाँच करण्यासाठी आदित्य संवाद नावाचा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यभर राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाची जबाबदारी वरुण यांच्याच खांद्यावर होती.

आदित्य यांनी मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. आदित्य यांच्या या पहिल्यावहिल्या निवडणुकीची सारी धुरा, सुत्रं ही वरुण यांच्याकडेच होती.

शिवसेनेच्या पक्ष संघटनेतही त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचण्याचा एक मार्ग म्हणूनही लोक त्यांची ओळख सांगतात. त्यामुळेच एक्स दर्जाच्या सुरक्षेवरून सध्या सरकारवर जी टीका होतेय, त्या सगळ्यांना ही पार्श्वभूमी आहे.

वरुण हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांनी मांडलेली भूमिका ही ठाकरे घराण्याची भूमिका मानली जाते. ठाकरे कुटुंब अधिकृतपणे जे बोलू शकत नाही, तेच वरुण सरदेसाई बोलतात, असंही म्हटलं जातं.

गेल्या काही काळापासून रश्मी ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षसंघटनेवर मोठी पकड निर्माण होतेय. एकीकडे वरुण सरदेसाई यांची राजकीय पाळंमुळं घट्ट होत असतानाच अलीकडे आता रश्मी ठाकरे यांच्या भावाचा मुलगा शौनक पाटणकरही प्रकाशझोतात आलाय. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तो दिसू लागलाय. वरुण सरदेसाई यांच्यावर सध्या जी टीका होतेय, त्याला ही राजकीय पार्श्वभूमी आहे.

    follow whatsapp