२१ जूनला महाराष्ट्रात झालेलं राजकीय बंड हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर म्हणजेच उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंड केलं. त्यांना साथ लाभली आहे ती शिवसेनेतल्या ४० आमदारांची. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. त्यानंतर एका आमदाराचं निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या ५५ झाली. त्यातल्या ४० आमदार शिंदे गटाच्या बाजूने गेले आहेत. आता पक्ष फुटीपासून वाचवण्याची धुरा आहे ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर.
ADVERTISEMENT
२१ जूनला जे बंड झालं त्यानंतर बंड करून गेलेले आमदार परत येतील असं शिवसेनेकडून बोललं जात होतं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना भावनिक सादही घातली. तसंच काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं सांगत त्यांनी राजकीय डावपेचही खेळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत हे सांगत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील एकाही आमदाराने उद्धव ठाकरेंचं हे भावनिक आव्हान मान्य केलं नाही. तसंच त्यांच्या राजकीय डावपेचातही कुणी अडकलं नाही.
शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला स्थापन केला. आधी मराठी माणसाची लढाई शिवसेनेने लढली त्यानंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली. गर्व से कहों हे हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. मात्र २०१९ ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत उद्धव ठाकरे गेले त्यामुळे आपली अडचण होते आहे. अनेक गोष्टींवर भूमिका घेता येत नाही अशा सगळ्या आरोपांच्या फैरी बंडखोर आमदारांनी झाडल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना हा पक्ष दुभंगला आहे. शिवसेना सत्तेत होती तरीही त्यातला एवढा मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत गेला आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या साथीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले.
या सगळ्या राजकीय परिस्थितीनंतर आता शिवसेनेसमोर खरं आव्हान आहे ते पक्ष फुटीपासून वाचवण्याचं. यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आदित्य ठाकरे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी शुक्रवारपासून निष्ठा यात्राही काढली आहे. त्यांच्या या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मात्र खरा प्रश्न हाच आहे की आदित्य ठाकरे हे शिवसेनेला नवसंजीवनी देण्यात यशस्वी ठरतील का?
आदित्य ठाकरेंसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत?
गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमधून निवडून जाणारे आमदार फुटले आहेत, त्यामुळे पक्षही दुभंगला आहे हा दुभंगलेला पक्ष एकसंध करणं
लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या ठिकाणी शिवसेनेचा चांगला जोर होता. मात्र नुकतेच नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली येथील माजी नगरसेवक शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. असंच मुंबईत झाल्यास ठाकरे गट आणखी कमकुवत होऊ शकतो. त्या गटाला बळकटी मिळवून देणं.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची गेल्या काही दशकांपासून सत्ता आहे. ही सत्ता अबाधित ठेवण्याचं मुख्य आव्हान आदित्य ठाकरे यांच्यासमोर आहे.
सामान्य शिवसैनिक हा आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला प्रतिसाद देतो आहे. मात्र त्या प्रतिसादाचं मतांमध्ये परिवर्तन होणार का? हे पाहणं हेदेखील आदित्य ठाकरेंसमोरचं आव्हान आहे.
तूर्तास या चार आव्हानांचा विचार केला तरीही ही चार आव्हानं आदित्य ठाकरे यांच्या राजकीय अनुभवाच्या मानाने मोठी आव्हानं आहेत. आदित्य ठाकरे २०१९ ला आमदार झाले. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढलेले आणि आमदार झालेले ते पहिले आमदार आहेत. त्यांना स्वतःलाही परत निवडणुका झाल्या तर परत निवडून यावं लागेल. आपला राजकीय पाया अत्यंत पक्का करावा लागेल. त्यामुळे २०२४ ला ज्या निवडणुका होतील त्यात निवडून येण्याचंही आव्हान त्यांच्यासमोर आहेच. अशात आदित्य ठाकरे हे आता पक्षबांधणी कशी करणार, त्यासाठी काय काय रणनीती वापरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आदित्य ठाकरे यांचा मागच्या अडीच वर्षातील राजकीय अनुभव पाहिला तर बरेच परिपक्व राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. राजकारणात आपण परिपक्व होत चाललो आहोत याचा प्रत्यय तेव्हाच आला जेव्हा विधानसभेत अधिवेशन सुरू होतं आणि निलेश राणे यांनी त्यांचा म्याव म्याव आवाज काढत डिवचलं तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. मात्र अशी एखादी टीका सोडून देणं, त्यावर व्यक्त न होणं हे सत्तेत असताना जमणं आणि सत्तेत नसताना जमणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
४० आमदारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया या भडक स्वरूपाच्या म्हणाव्यात अशाच होत्या. गटारातली घाण निघून गेली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई झाली अशा काही प्रतिक्रिया त्यांनी चाळीस आमदारांबाबत दिल्या होत्या. मात्र आता या प्रतिक्रिया देऊन त्या आपल्या उलट जातील हे त्यांना लक्षात आल्याने आता याबाबत ते काहीसे सौम्य झालेले दिसत आहेत.
निघून गेलेले ४० आमदार, माजी नगरसेवक हे परत येणार नाहीत हे लक्षात घेऊनच आदित्य ठाकरे तयारीला लागले आहेत. ते अभ्यासू आहेत. राजकीय परिपक्वता हळूहळू येते आहे. मात्र आपल्याच पक्षातल्या लोकांच्या विरोधात त्यांना नव्याने पक्षबांधणी करायची आहे. एवढंच नाही तर ती यशस्वीही करून दाखवायची आहे. हे एखादं शिवधनुष्य पेलण्याइतकंच कठीण आहे. हे आव्हान त्यांनी स्वीकारलं असलं तरीही ते शिवसेनेला अपेक्षित यश मिळवून देत नवसंजीवनी देतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT