–विकास राजूरकर, चंद्रपूर
ADVERTISEMENT
चद्रंपूरपासून मुल रोडवर १५ किमी अंतरावर घंटाचौकी नावाचं खेडं आणि प्राचीन शिव मंदिर आहे. ह्याच मंदिराजवळ तब्बल १ किमी परिसरात ८०० वर्षपूर्वीचा लोह अवजारे बनवण्याचा प्राचीन कारखाना आढळून आला आहे. भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांना येथे काही पुरातन अवशेष मिळाले आहेत.
शिव मंदिर आणि इतर मंदिरं बांधण्यासाठी दगड फोडण्यासाठी लागणारी छन्नी आणि इतर अवजारे बनवण्यासाठी मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. हा लोह कारखाना ११ किंवा १२व्या शतकातील परमार राज्यांच्या काळातील असावा असं मत पुरातत्व अभ्यासक सुरेश चोपने यांनी व्यक्त केलं आहे.
१५ वर्षांपूर्वी सुरेश चोपने यांना हे ठिकाण सापडलं होतं. त्यावेळी येथे केवळ गाळलेल्या लोखंडाचे तुकडे आढळत होते. मागील वर्षी लॉकडाऊन काळात तिथे सविस्तर सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यात आलं. त्यावेळी गाळलेल्या लोखंडाची असंख्य लहान-मोठे तकुडे, लोखंडाची अवजारे बनवण्यासाठीची दोन छिद्रांचे अनेक मातीचे साचे सापडले.
विविध काळातील लोह कारखाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळलेली आहेत. १ किमी परिसरात पसरलेला हा सर्वात मोठा प्राचीन लोह कारखाना आहे. बहुदा येथनू बनवलेली छन्नी आणि अवजारे इतर ठिकाणी दगड फोडून मंदिरे आणि वास्तु बांधण्यासाठी वापरली जात असावी.
पुढील काळातील राज्यांनी सुद्धा येथील लोह खडकापासून अवजारे बनवली असण्याची शक्यता आहे. अजून इथे नाणी किंवा इतर ऐतिहासिक पुरावे मिळाले नाही, परंतु आणखी पुराव्यांच्या आधारे या प्राचीन वारशाची अचूक माहिती समोर येऊ शकते, असं चोपने म्हणाले.
घंटा चौकीचे हे शिव मंदिर नागरी स्थापत्यशैलीनुसार ११/१२ व्या शतकातील राजा जगदेव परमार (१०९५-११३४ ) यांच्या काळात बांधले गेले होते.परमार राजे हे शिव भक्त असल्यामुळेच त्यांनी आजच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनके मंदिरे बांधली.
त्यात प्रसिद्ध माकंडा मंदिर समूह, सिद्धेश्वर मंदिर समूह, गडचांदुर येथील मंदिर समूह, जुगादचे मंदिर आणि भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर बांधले होते. या सर्व मंदिरांच्या बांधकामासाठी विविध आकाराच्या दगडांना आकार देण्यासाठी छन्नी आणि इतर अवजारे लागत असत.
अवजारांसाठी प्राचीन काळात लोह खनिज असलेल्या दगडांपासून भट्टीच्या माध्यमानं तरल लोखंड तयार केले जात असे. या तरल लोखंडाला साच्यात टाकून विशिष्ट आकाराची अवजारं बनवली जात असे. त्यात छन्नी, हातोडे यांचा समावेश असे. यासाठी लोह खनिजे असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन तिथे अशा दगडांना भट्टीत उच्च तापमानात तापवून तरल लोह बनवली जात.
आजचा लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अशा लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. बहुदा यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडलं असावं, असं सांगितलं जातं.
शिव मंदिराच्या दक्षिणेला पूर्व-पश्चिम रेषेत १ किमी परिसरात लोखंडी अवजारे बनवण्याच्या ३० मोठ्या लोह खनिज गाळण्याच्या भट्ट्या आढळल्या. जवळच नाला असल्याने तेथील पाण्याचा वापर केला जात होता. याच ठिकाणी आजही लोह खनिज असलेले हजारो खडक आणि लोह तुकडे आढळतात. या लोखंडाची वैशिष्ट्य म्हणजे आजही त्याला जंग लागलेला नाही. त्यामुळे ही अवजारं चांगल्या धातूची आणि अतिशय मजबूत अशी बनववली गेलीये.
घंटाचौकी मंदिर परिसरात आता जंगल झालं असल्यानं आणि वन विभागाची अनेक कामे, खोदकामे झाली आहेत. सध्याही सुरू आहेत. स्थळाचं उत्खनन आणि संशोधन झाल्यास अनेक प्राचीन रहस्य उलगडण्यास साहाय्यभूत ठरणारे पुरावे सापडू शकतात. पुरातत्व विभागाने आणि विद्यापीठ संशोधकांनी इथे अभ्यास करून ८०० वर्षांपूर्वीचा इतिहास पुढे आणावा, असंही प्रा. सुरेश चोपने यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT