MNS: आता BJP काय करणार? राज ठाकरेंना हव्या विधानसभेच्या 'एवढ्या' जागा!

मुंबई तक

12 Jun 2024 (अपडेटेड: 12 Jun 2024, 03:56 PM)

Maharashtra Assembly Election 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने भाजपकडे 20 जागांची मागणी केली आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागांवर मुंबईतील जागा आहेत.

राज ठाकरेंना विधानसभेच्या 20 जागा हव्या!

राज ठाकरेंना विधानसभेच्या 20 जागा हव्या!

follow google news

MNS Maharashtra Assembly Election 2024: मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरू केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केली आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागांवर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) जागा आहेत. (20 seats in maharashtra assembly election 2024 mns candidate against aaditya thackeray raj thackeray put a demand before bjp)

हे वाचलं का?

मनसेला विधानसभा निवडणुकीसाठी हव्यात 'या' जागा

यामध्ये वरळी, दादर-माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुण्यातील एका जागेचा समावेश आहे.

हे ही वाचा>> शरद पवारांचा खासदार अजित पवारांसोबत जाणार, सत्य काय?

आदित्य ठाकरेंविरोधातही मनसे देणार उमेदवार!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र आता आगामी निवडणुकीत मनसे वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊ शकतं. तर नितीन सरदेसाई यांना दादर-माहीममधून आणि शालिनी ठाकरेंना वर्सोव्यातून तिकीट देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक होता. येथे भाजपच्या जागा 23 वरून थेट 9 वर आल्या. या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार असल्याने पक्षांतर्गत धोक्याची घंटा वाजली आहे. आव्हाने आणि उणिवा ओळखून त्यानुसार रणनिती आखण्यासाठी महाराष्ट्र भाजपने 14 जून रोजी मुंबईत आपल्या जिल्हा शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

हे ही वाचा>> 'अजित पवारांना सोबत का घेतलं?' RSS ने भाजपवर संतापली!

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे प्रमुख नेते संबोधित करणार आहेत. 14 जूनच्या बैठकीत भाजप त्या सर्व घटकांचे विश्लेषण करेल ज्यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाली. पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात शेतकऱ्यांमधील असंतोषाचा प्रश्न सोडवावा लागेल, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. 

या प्रदेशातील मुख्य पिके कापूस आणि सोयाबीन आहेत आणि अलीकडील भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आताच तयारी सुरू केली आहे. 

    follow whatsapp