नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (Aap) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना राज्यसभेतून (Rajyasabha) निलंबित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संजय सिंह यांना संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळासाठी निलंबित केले आहे. (aap mp sanjay singh suspended rajya sabha know when and how a mp is suspended politics in marathi)
ADVERTISEMENT
राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. संजय सिंग यांना ‘अशोभनीय वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
खरे तर, सोमवारी विरोधक मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असे सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटेच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळही आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.
यानंतर संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आले. म्हणजे या पावसाळी अधिवेशनात संजय सिंह राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.
संजय सिंह यांच्या निलंबनावरून बराच गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही सोमवारी रात्री संसदेबाहेर रात्रभर धरणे आंदोलन केले. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, जर त्यांना सत्य बोलल्याबद्दल निलंबित करण्यात आले असेल तर आम्ही याबाबत अजिबात निराश नाहीत.
विरोधी खासदाराला सभागृहातून निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा गोंधळ घालणे आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. अशा स्थितीत तुम्हाला माहीत आहे का असा कोणता नियम आहे, ज्यामुळे खासदारांचे निलंबन होते.
तो नियम काय आहे?
– कोणताही सदस्य अध्यक्षांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करत आहे किंवा वारंवार आणि जाणीवपूर्वक कामकाजात अडथळा आणत आहे, असे अध्यक्षांना वाटत असेल, तर त्या सदस्याला निलंबित केले जाऊ शकते.
– अध्यक्ष त्या सदस्याला ठराविक कालावधीसाठी निलंबित करू शकतात. हा कालावधी काही दिवसांसाठी किंवा संपूर्ण सत्रासाठी लागू होऊ शकतो. अध्यक्ष एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त सत्रासाठी निलंबित करू शकत नाही.
– अध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर त्या सदस्याला तातडीने सभागृहाबाहेर जावे लागते.
खासदारांना एका दिवसासाठी निलंबित करता येत नाही का?
– करता येतं. राज्यसभेच्या नियम पुस्तकातील नियम 255 नुसार सदस्याला एका दिवसासाठी निलंबित केले जाऊ शकते. जर कोणताही सदस्य कामकाजात अडथळा आणत असेल किंवा गैरवर्तन करत असेल तर त्याला नियम 255 अन्वये त्या दिवसाच्या कामकाजातून निलंबित केले जाऊ शकते.
निलंबन परत मागे घेता येत नाही का?
निलंबन मागे घेतले जाऊ शकते, परंतु सदस्याने त्याच्या वर्तनाबद्दल माफी मागितली तरच हे शक्य आहे. संजय सिंह यांनी माफी मागितल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाऊ शकते.
लोकसभेत काय नियम आहेत?
लोकसभेतूनही खासदाराला एक दिवस, काही दिवस किंवा संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले जाऊ शकते. हा अधिकार लोकसभेच्या नियम पुस्तकातील नियम 373 आणि 374 मध्ये आहे.
– नियम 373 नुसार खासदाराला एका दिवसासाठी निलंबित केले जाऊ शकते, तर नियम 374 नुसार लोकसभा अध्यक्षांना ठराविक कालावधीसाठी आणि संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा अधिकार आहे.
ADVERTISEMENT