Ajit pawar gets angry : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाला. हा लाठीमार कुणाच्या आदेशावरून करण्यात आला, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी आरोप करणाऱ्यांना खुलं आव्हान दिलं. (Ajit Pawar Gets Angry)
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण मुद्द्यावर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार चिडले.
उद्धव ठाकरे सरकारला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकवता आलं नाही, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही पत्रकार आहात. कुठलीही समिती केल्यानंतर… समिती आपापली भूमिका मांडत असते. सदस्य भूमिका मांडतात. शेवटी त्यामधील प्रमुख व्यक्तीचा निर्णय अंतिम असतो. आजही मी काय सांगितलं, देवेंद्रजींनी काय सांगितलं, पण शेवटी अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतात. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी हे आरक्षण टिकण्यासाठी आमच्या परीने सूचना केल्या. शेवटी प्रमुखांनी अंतिम निर्णय घ्यायचा असतो. ज्यावेळी टिकतं त्यावेळी प्रमुख श्रेय घेतो. टिकत नाही, त्यावेळी प्रमुखानेच जबाबदारी घेतली पाहिजे. दुसऱ्यांनी जबाबदारी घेऊन चालत नाही.
लाठीमाराचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले. ते म्हणाले, “चला दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही तिघांनी आदेश दिले असतील ना, तर सिद्ध करावं. राजकारणातून बाजूला होईल. तशा पद्धतीने त्यांनी सिद्ध केले नाही, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे.”
काटेवाडीतील ग्रामस्थांनी अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. इतकंच नाहीतर राजीनामा शक्य नसेल, तर सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणी केली. या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “काटेवाडीचा विषय तुम्ही काढला. माझं गाव आहे म्हणून काढला ना. अख्ख्या महाराष्ट्रात 40 हजार गावे आहेत. त्यांचा विषय निघाला नाही. मी ताबडतोब सरपंचाला फोन केला. तिथे कुणी ही मागणी केली, असं विचारलं. तो म्हणाला, ‘दादा, आम्ही कुणीही तिथे नव्हतो. एका व्यक्तीने तशी मागणी केली. आता एवढ्या मोठ्या राज्यात. 14 कोटी लोकांमध्ये एकाने मागणी केली आणि त्याला माध्यमांनी उचलून धरलं, तर त्याला एवढा काही अधिकार नाहीये. त्यामुळे मागणीमध्ये काहीही तथ्य नाहीये”, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT