Nawab Malik NCP : नवाब मलिकांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला. वैद्यकीय कारणांच्या आधारावर मलिकांना जामीन मिळाला, पण बाहेर आल्यापासून त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी चांगल्याच वाढल्यात. आधी सुप्रिया सुळे भेटल्या. त्यापाठोपाठ प्रफुल पटेल, सुनील तटकरे भेटले आणि त्यानंतर शरद पवारांनीही फोन केला. यात एक प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, तो म्हणजे मलिक कुणाच्या बाजूने आहेत? मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, पण ते करताना मोठी खेळी केलीये. तेच समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीत 2 जुलै रोजी बंड झाले. अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला. शरद पवारांच्यासोबत असलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्ही मूळ राष्ट्रवादीचा दावा केला. अचानक झालेल्या बंडाने गोंधळ उडाला तो पक्षाच्या आमदारांचा. असाच गोंधळ नवाब मलिकांचाही झालाय आणि त्यांनीही कुंपणावरच राहण्याची भूमिका घेतलीये.
नवाब मलिक शरद पवारांकडे की अजित पवारांकडे?
नवाब मलिकांच्या मनात काय असा प्रश्न ते तुरुंगातून बाहेर आल्यापासून उपस्थित होतोय. यातच नवाब मलिकांनी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला बोलताना एक विधान केलं. ते म्हणाले, “मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे.”
वाचा >> Vijay Wadettiwar : ‘मोदींची अजित पवारांना अट! शरद पवार आले तरच मुख्यमंत्रीपद’
नवाब मलिकांचं हे विधान सरळ वाटत असलं, तरी त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशीच दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे अशी भूमिका घेणारे नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले आमदार नाहीत. यापूर्वी अनेक आमदारांनी अशीच भूमिका घेतलीये आणि अधिवेशन काळातही ते दिसून आलं.
वाचा >> Raj Thackeray Speech : पवारांची नक्कल, भाजपला घेतलं फैलावर; ठाकरेंनी धुतलं
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, असंच उत्तर दिलं. मी अजित पवारांसोबत किंवा मी शरद पवारांसोबत म्हणणारे आमदार खूपच कमी होते. ते अधिवेशन काळात स्पष्टपणे भूमिका घेताना दिसले. पण ज्यांनी आम्ही राष्ट्रवादी सोबत अशी भूमिका घेतली, ते अजूनही कुंपणावरच आहेत. कारण मलिकांना जयंत पाटलांप्रमाणे मी शरद पवारांसोबत आहे, अशीही भूमिका मांडताना आली असती किंवा धनंजय मुंडेप्रमाणे मी अजित पवारांसोबत असल्याची. त्यांनी दोन्ही नेत्यांची नावे घेणं टाळत स्वतःला सेफ करून घेतलं.
मूळ राष्ट्रवादी कुणाची?
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, असा दावा शरद पवारांच्या नेत्यांकडून केलाय जातोय. तसाच तो अजित पवार गटाकडूनही केला जातोय. पण, हे प्रकरण गेलंय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात. त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयोग निकाल देत नाही, तोपर्यंत मूळ राष्ट्रवादी कुणाची, स्पष्ट होणार नाही. त्याचाच फायदा आता मलिकांनी घेतल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता मूळ राष्ट्रवादी कुणाकडे राहणार, यावर बरंच काही ठरणार, असेच आता दिसत आहे.
ADVERTISEMENT