Ajit Pawar : राज्यात सातत्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होताहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचेही बॅनर्स झळकले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देऊन ते दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एक मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. तो होता रोहित पवार यांच्या झळकलेल्या बॅनर्सचा. भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं.
भावी मुख्यमंत्री… अजित पवार काय बोलले?
आमदार रोहित पवार यांचे पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. पत्रकारांनी रोहित पवारांच्या झळकलेल्या बॅनर्सवर प्रश्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री व्हायचं कोण शिल्लकच राहणार नाही. सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत.”
हेही वाचा >> Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?
“माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर 145 चा आकडा आहे; तोच मुख्यमंत्री होतो, अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं”, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> “वहिनी, एक शब्द देतेय…”, रश्मी ठाकरेंना सुषमा अंधारेंनी काय दिलं वचन?
शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या भेटीबद्दल…
अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे. अजित पवार यांना ‘त्या’ फोटोवरून प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर बोलायचं टाळलं. “विकासाचा मुद्दा आणि शहरातील समस्यांबद्दल विचारा”, असं सांगत त्यांनी या मुद्द्याला बगल दिली.
पडळकर वाचाळवीर… अजित पवारांनी काय दिलं उत्तर?
गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. हा प्रश्न विचारताच अजित पवारांनी असल्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर दुर्लक्षित केलं. ‘महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती किंवा परंपरा नाही”, असं देखील अजित पवारांनी म्हटलं.
ADVERTISEMENT