राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचे, राज्यात पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटनंतर ही चर्चा सुरू झाली. यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबद्दल ‘मुंबई Tak बैठक’मध्ये संजय राऊतांनी भाष्य केलं.
ADVERTISEMENT
‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली, आता सगळं सुरळीत झालं असं समजायचं का?’ असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “सगळं सुरळीत आहे. आम्ही कायम हसरेच आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रडके चेहरे भविष्यात दिसतील.”
हेही वाचा >> शिरसाटांचं ‘ते’ विधान अन् सुषमा अंधारेंच्या डोळ्यात आलं पाणी, दाटलेल्या कंठाने म्हणाल्या…
आता अशी चर्चा सुरू आहे की, अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे काही लोक जाऊ शकतात. 2019ची पुनरावृत्ती होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोक जाऊ शकतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्याकडे गेल्यावर आम्ही त्याच्यावर चर्चा केली. इतके मोठे नेते आहेत. उद्धवजी एका पक्षाचे नेते आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत. राजकारणात आम्ही एकत्र काम करतोय. आम्ही त्याच्यावर चर्चा केली. शरद पवारांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं.”
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “त्यांच्या आमदारांवर नक्कीच ईडी, सीबीआय या यंत्रणांचा दबाब आहे. गुन्हे दाखल करून त्यांना अटकेची भीती दाखवली जात आहे. तुम्ही आमच्या पक्षात या. तुम्ही एक गट तयार करा, अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. त्यावर आम्ही सुद्धा शरद पवारांना सांगितलं की, काय सुरू आहे? शरद पवार म्हणाले काहीही झालं तरी आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि जे जातील, त्यांचा पराभव करायचा आहे. परत महाराष्ट्रात आपलं सरकार आणायचं आहे, असं त्यांनी सांगितलं”, असं संजय राऊत म्हणाले.
“आम्ही हातात दगड घेऊनच जन्माला आलोय…”, पवारांच्या विधानावर राऊत काय म्हणाले?
‘उद्धव ठाकरेंच्या फडतूस बद्दलच्या विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली की, यापद्धतीने बोलणं बरोबर नाही’, या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. शिवसेनेची वेगळी आहे. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आमची चळवळ सहकार क्षेत्रातील नाही. आम्ही नेहरू सेंटर किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चालवत नाही.”
“आमच्या चळवळी सगळ्या रस्त्यावरच्या. आम्ही हातात दगड घेऊन जन्माला आलो आहोत. जोपर्यंत नेम धरून दगड मारला जात नाही, तोपर्यंत आम्हाला स्वस्थ वाटत नाही. म्हणून तर मराठी माणूस टिकून आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT