Amit Shah Sharad Pawar Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोट ठेवत अमित शाहांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना अमित शाह म्हणाले, "आपल्याकडे असं म्हणतात की, गोष्टीचं अस्तित्व हे आकाश, भूमी आणि पाताळापर्यंत असतं. पण, काँग्रेसने तर अंतराळात घोटाळा केला. पाताळातून पुढे जाऊन खदाणींमध्ये घोटाळा केला. समुद्रालाही सोडलं नाही, तिथेही पाणबुडी घोटाळा केला."
काँग्रेसने लाखो करोडोंचे घोटाळे केले -शाह
अमित शाह काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले, "प्रत्येक ठिकाणी काँग्रेसने घोटाळे केले आणि इंडिया अलायन्सचं नेतृत्व काँग्रेसच्या हातात आहे. मी जनतेला विचारू इच्छितो की, कोणत्या प्रकारची क्षमता? एकीकडे लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे करणारी काँग्रेस आहे, तर दुसरीकडे 23 वर्षांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे नेतृत्व करूनही आमचे विरोधकही एका रुपयाचा आरोप करू शकले नाही. असं नेतृत्व नरेंद्र मोदींचं आहे."
"देशातील जनतेने हे ठरवायचं आहे की देशाचं भविष्य भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात सोपवायचं आहे की, प्रामाणिक व्यक्ती ज्याच्यावर शत्रूही आरोप शकत अशा नरेंद्र मोदींवर सोपवायचं आहे?", असा सवाल अमित शाह यांनी केला.
त्यांच्या स्वतःच्या पक्षात लोकशाही नाही -अमित शाह
"मला जर कुणी विचारलं की इंडिया अलायन्स काय आहे, तर मी याची एकच व्याख्या सांगेन. सात घराणेशाही पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया अलायन्स. यापेक्षा काही नाहीये. जे स्वतःच्या पक्षात लोकशाही प्रस्थापित करू शकत नाही, ते देशाच्या लोकशाहीची रक्षा करू शकत नाही", असे म्हणत अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.
शाह कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "एकीकडे मोदीजी गरिबांसाठी आणि देशासाठी काम करत आहेत. दुसरीकडे आपल्या कुटुंबाची चिंता करणारे पक्ष आहे. याचे राजकारणातील उद्देश काय आहेत. मोदीजी म्हणतात महान भारताचं निर्माण व्हावे. 2047 पर्यंत लक्ष्य ठेवलं आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा."
"पवार-ठाकरेंना त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं"
अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "सोनिया गांधींचा उद्देश राहुल गांधींनी पंतप्रधान करायचं. शरद पवारांचं लक्ष्य मुलीला मुख्यमंत्री करायचं. ममता बॅनर्जीचा उद्देश भाच्याला मुख्यमंत्री करणे. स्टॅलिनचा लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री करणे. लालू प्रसाद यादव यांचे उद्दिष्ट आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, उद्धव ठाकरेंचे उद्दिष्ट आपल्याला मुलाला मुख्यमंत्री करणे. आणि मुलायम सिंह मुलाला मुख्यमंत्री बनवून गेले आहेत", अशा शब्दात शाहांनी विरोधकांवर शरसंधान साधले.
"ज्यांचे लक्ष्य आपला मुलगा, मुलगी आणि भाच्याचे कल्याणाचे असेल, तर ते गरिबांचं कल्याण करू शकतात का? कधीच करू शकत नाही. ज्यांचं लक्ष्य आपल्या कुटुंबासाठी सत्ता मिळवणे असेल, ते देशाचे कल्याण करू शकतात का? कधी नाही करू शकत", अशी टीका अमित शाहांनी विरोधकांवर केली.
ADVERTISEMENT