Ashish Deshmukh bjp : काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्यानंतर माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुखांनी कमळ हाती घेतले. भाजपत प्रवेश केल्यानंतर आशिष देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्ला चढवला. विदर्भातून नानागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देशमुखांनी दिला.
ADVERTISEMENT
नागपूर येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात आशिष देशमुख म्हणाले, “विदर्भाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री असणं फायद्याचं होतं. 2019 ची निवडणूक भाजप-शिवसेनेने फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. पण, शिवसेनेने फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, तर तलवार टाकली. ही तलवार विदर्भात टाकली आणि उद्धव ठाकरेंनी विदर्भाशी द्रोह केला. त्याला जागा दाखवून देण्याचं काम आपल्याला येत्या निवडणुकीत करायचं आहे. ”
“काँग्रेस, गांधी परिवार ओबीसी द्रोही”
ज्या कारणावरून आशिष देशमुखांना निलंबित करण्यात आलं. त्या मुद्द्यावर बोलताना देशमुखांनी काँग्रेस ओबीसीद्रोही असल्याची टीका केली. “राहुल गांधींनी 2019 च्या निवडणूक प्रचारात अनावधानाने ओबीसींबद्दल चुकीचं म्हटलं असेल, तर त्यांनी देशात 54 टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागावी. त्यांनी राफेल, चौकीदार चोर प्रकरणा बिनशर्थ माफी मागितली होती. पण, ओबीसींचा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी माफी मागितली नाही. म्हणून काँग्रेस असो वा गांधी परिवार हा ओबीसी द्रोही आहे, हे मी ठामपणे सांगतो”, असे आशिष देशमुख म्हणाले.
हेही वाचा >> Manisha Kayande : उद्धव ठाकरेंना झटका, महिला आमदार लवकरच शिंदेंच्या सेनेत!
“मी जाणीवपूर्वक सगळ्यांसमोर जाहीर करतो की, मी येणाऱ्या 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून भाजपसाठी काम करेन. ओबीसींच्या हितासाठी भाजपच्या माध्यमातून करेन”, अशी घोषणा आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली.
नानागिरी संपवणार… देशमुख काय म्हणाले?
काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधताना देशमुख म्हणाले, “काटोलातील काकागिरी, सावनेरमधील दादागिरी विदर्भातील नानागिरी आशिष देशमुख संपवल्याशिवाय राहणार नाही. चाणक्याने उमेदवार निवडावा. त्याला निवडून आणण्याचं काम मी करेन. काटोलातील काकागिरी संपवण्याचे काम मी करेन.”
हेही वाचा >> औरंगजेबाच्या कबरीवर ‘आंबेडकर’ नतमस्तक, भाजप नेत्याने ठाकरेंनाच केलं टार्गेट
“आमदारकी काय… माझे वडील आमदार होते. माझे काका आमदार होते. माझे सासरे आमदार होते. माझ्या दोन्ही आत्या आमदार होत्या. या नाना पटोलेला आमदार आम्ही केले. त्या नितीन राऊतला आमदार आम्ही केले. आमदारकी माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. आमदार असतो, तर राजीनामा दिला असता. मी रणजित देशमुखांचा मुलगा असल्याचा अभिमान आहे. त्यांचा मुलगा असल्याने काँग्रेसकडे कल होता, पण आता अनुभव आला. आता तहहयात भाजपत राहणार”, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी मांडली.
ADVERTISEMENT