महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या टाटा एअरबस प्रोजेक्टवरून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले. त्याचबरोबर कॅगकडून चौकशी करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं.
आशिष शेलार म्हणाले, “मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचं आम्ही सातत्यानं सांगत होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की, महालेखा परिक्षण करू. त्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढल्याची माहिती आहे.”
ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार? BMC च्या व्यवहारांवर संशय, ‘कॅग’ करणार चौकशी
“२८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात जवळजवळ १२ हजार १३ कोटींची कंत्राट दिली गेली. यासंबंधीची तक्रार आहे”, असंही आशिष शेलार म्हणाले.
“कोरोना काळात कंत्राटदार आणि सत्तेत बसलेली लोक खिसा कसा गरम होईल याची भ्रांत होती. कोरोना काळात ३ हजार ५३८ कोटींची खरेदी झाली. याची कॅगकडून चौकशी होणार आहे. महापालिकेनं केलेल्या भूखंडाच्या श्रीखंडाचीही चौकशी होणार आहे. त्याचबरोबर चार पुलांसाठी अमर्याद खर्च करण्यात आला”, असा आरोप शेलारांनी केलाय.
“२८ नोव्हेंबर २०१९ पासून ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंतच्या काळातील व्यवहारांच्या चौकशा होणार आहेत. आम्ही याचं स्वागत करतो. माजले होते ते बोके, कोरोना काळात खाऊन खोके. त्या सगळ्यांची संपूर्ण चौकशी एकदम ओके”, असं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या ‘५० खोके एकदम ओके’ घोषणेला प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरेंच्या टीकेवर आशिष शेलार काय म्हणाले?
प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय. पंतप्रधानांचा विचार विशाल असला पाहिजे, संपूर्ण देशासाठी असला पाहिजे. सर्व राज्यांचा विकास होणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर आशिष शेलार म्हणाले, “शंभर टक्के पंतप्रधान समान न्याय देतात. किंबहुना त्याचमुळे धारावीच्या प्रकल्पाचं स्वप्न बऱ्याच जणांनी दाखवलं. पण ते पूर्ण करण्यासाठी रेल्वेची स्वतःची जागा देण्याचं पहिलं उदाहरण महाराष्ट्रात घडलंय. एअर इंडियाची बिल्डिंग बाहेर जाईल म्हणून घोषणा करणारी बरीच लोक होती. पण, ती बिल्डिंग मुंबईकरांच्या सेवेत देण्याचं काम पंतप्रधानांच्या माध्यमातून झालंय.”
“मुंबई दिल्ली, मुंबई अहमदाबाद मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, या विकास कामासाठी लागणारा निधी, परवानग्या हे केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयातूनच देत आहे. समोर दिसलेल्या टीझरवर प्रतिक्रिया देण्यात परिपक्व राजकारण आहे, असं मी मानत नाही. राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो आणि त्यामुळे त्याची संबंधित माहिती मी त्यांना देईन”, असं आशिष शेलार म्हणाले.
‘प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातोय’, राज ठाकरेंचा मोदींना सल्ला, करुन दिली जबाबदारीची जाणीव
“महाराष्ट्रातल्या रांजणगावला येणाऱ्या ईलेक्ट्रिक क्लस्टरची आजच घोषणा झालीये. चार महिन्यात जे प्रकल्प महाराष्ट्रात येताहेत त्याबद्दलही राज ठाकरेंनी अभिनंदन करावं, अशी मी त्यांना विनंती करेन”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT