Rajya Sabha Election 2024 Maharashtra : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून, निवडणूक होत आहे. सहापैकी तीन जणांना निवडून पाठवता येईल, इतकं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, भाजप चौथा उमेदवारही निवडणुकीत उतरवणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपचा निर्णय झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे 2022 मधील निवडणुकीप्रमाणेच यावेळी महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता बळावली आहे. (Ashok Chavan May Be Fourth Candidate Of bjp)
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. ते भाजपचे राज्यसभा निवडणुकीत उमेदवार असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तशी तयारीही चव्हाण यांनी केली आहे.
चौथा उमेदवार... मविआ समोर आव्हान
2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटली होती. त्यामुळे भाजपला त्यांच्या उमेदवार जिंकून आणणं शक्य झालं होतं. यावेळी भाजपकडे तीन उमेदवार राज्यसभेवर पाठवता येईल इतके संख्याबळ आहे, मात्र चौथा उमेदवार दिल्यास भाजपला महाविकास आघाडीतील मतांची गरज पडणार आहे.
काँग्रेसची मते फुटल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याची चौकशी झाली. चौकशी अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या उमेदवार मतदान करू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
नारायण राणेंना लढवावी लागणार लोकसभा?
भाजपच्या हायकमांडने मंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी नारायण राणे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल. महायुतीमधील काही नेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादी फुटली... काँग्रेस रडारवर
शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही अजित पवारांकडे गेली. त्यानंतर आता काँग्रेस भाजपच्या रडारवर असल्याचे राजकीय वर्तुळात उघडपणे म्हटले जात आहे. तसे दावे भाजप नेत्यांकडूनही केले जात आहेत. अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने याची सुरूवात झाली असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी काँग्रेस आमदार फुटणार, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT