Bacchu Kadu Latest News : एकीकडे भाजपकडून युतीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना आमदार बच्चू कडूंनी टेन्शन वाढवलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले बच्चू कडू आता विधानसभेच्या जागासाठी आग्रही भूमिका घेताना दिसत आहे. त्यावरूनच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढू शकते, अशी चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यातच आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून काही मतदारसंघावर दावा केलाय. बच्चू कडू म्हणालेत की, “विदर्भात प्रहार संघटनेचे 2 आमदार असून आमदारांची संख्या वाढवणं हे प्रहारसाठी गरजेचं आहे.”
“शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी प्रहारला मजबूत करणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात आम्ही 15 जागा लढवणार असून, युतीमध्ये मला घेतलं तर ठीक अन्यथा राम राम ठोकणार आहे. 2024 च्या निवडणुकीत आम्ही 10 ते 11 जागा नक्कीच जिंकू. आम्ही जिथे बसेल तिथे सरकार बसेल आणि आम्ही जिथं उठणार तिथं सरकार उठवलं जाणार”, असा दावा बच्चू कडूंनी केलाय.
एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार -बच्चू कडू
“एकनाथ शिंदे हे शंभर टक्के मुख्यमंत्री पदावर राहणार. त्यांना जर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना कुणी आडकाठी केली नाही, तर आम्ही दिव्यांगांसाठी व्यवस्थित नियोजन करणार आहोत. दिव्यांगांसाठी विध्यापीठ काढणार आहे. दिव्यांग मंत्रालय होऊन 5 ते 6 महिने झाले असून, मी पूर्ण राज्यभर दौरा करत आहे. दिव्यांगांच्या योजना लागू करण्यासाठी अजून तीन-चार वर्ष तरी लागतील”, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!
“पत्रकारांना तिखट आणि मिठाचा फरक समजत नाही. मी सरकारमध्ये आहे, मग बोलू नये असं होणार नाही. सरकारमधील लोकं माझ्या स्पष्ट बोलल्याने नाराज झाली तर मला त्याची पर्वा नाही. शेतकऱ्यांचा आवाज मी मांडत राहणार. मी कडू, तिखट आहे. माझ्याकडे एकनाथ शिंदेंसारखे 40-45 आमदार असते आणि माझ्यामुळे सरकार हलले असते, तर मी तुम्हाला सांगितलं असतं”, असं विधान बच्चू कडूंनी यावेळी केलं.
हेही वाचा >> Supriya Sule : ‘118 जागा लढल्यावर…’, दिलीप वळसे पाटलांवर सुळेंचा पलटवार
“आता मला बोंबलल्याशिवाय काही अर्थ नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे बोंबल्याने हे सरकार ताळ्यावर येईल. लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व आहे. ज्याची संख्या अधिक आहे त्याचे राज्य असते. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावे असं अधिक वाटत आहे. ती अपेक्षा ठेवणे काय वाईट आहे? अजितदादा मुख्यमंत्रीपद कधी मिळेल हे भविष्यकारांना विचारावे लागेल”, असा चिमटा बच्चू कडूंनी काढला.
‘ब्रह्मदेव जरी खाली आला तरी बच्चू कडू मंत्री होणार नाही’
“मला दाबण्याची अजून कोणाची औकात नाही. मंत्रीपद भेटलं नाही म्हणजे आम्हाला दाबलं. मंत्रिपद हे काय सर्वोच्च पद आहे का? मी लोकांचा प्रतिनिधी आहे म्हणून लोकांचं बोलणार, सरकारचं थोडीच बोलणार आहे. दिव्यांग मंत्रालय झालं, तेव्हा दहा वेळा मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात झालं आहे. त्यामुळे मंत्री मोठा की मंत्रालय मोठं? याच मला उत्तर द्या. 2024 पर्यंत ब्रह्मदेव जरी खाली आला तरी बच्चू कडू मंत्री होणार नाही आणि मला द्यायचं कारण नाही. मी आहे यात समाधानी आहे. मला मंत्रिपद देणार नाही हे मला माहित आहे आणि मी घेणारीही नाही”, असं सांगत बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या.
ADVERTISEMENT