Mallikarjun Kharge on BJP : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी (13 मार्च) संकेत दिला की, त्यांचा पक्ष आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ज्या बँक खात्यांमध्ये देणगीची रक्कम ठेवण्यात आली होती ती भाजप सरकारने फ्रीज केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ADVERTISEMENT
काँग्रेसला आयकर विभागाने दंडही ठोठावला आहे. देशातील संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आणि काँग्रेसचा विजय निश्चित करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे रहाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
'हा आमच्या पक्षाचा पैसा होता, जो तुम्ही लोकांनी दान म्हणून दिला होता, तो त्यांनी फ्रीज केला आहे. आमच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. भाजप याबाबत खुलासा करत नाहीत कारण त्यांची चोरी उघडकीस येईल. यामुळेच त्यांनी जुलैपर्यंत वेळ मागितला आहे.' असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
'आगामी निवडणुकीत गुलबर्ग्यातील लोक आपल्या चुका सुधारतील'- मल्लिकार्जुन खरगे
मोदींनी गुजरातमधील क्रिकेट स्टेडियमला स्वत:चे नाव दिल्याचा आरोप करत खरगे म्हणाले, 'तुम्ही अजूनही जिवंत आहात. एखादी व्यक्ती जिवंत असताना स्मारके बांधली जात नाहीत. कलबुर्गी (गुलबर्गा) येथील जनतेने आपली चूक सुधारून आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार केला आहे,' असा दावाही त्यांनी केला.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये खरगेंचा गुलबर्ग्यातून पराभव
2019 मध्ये खरगे यांनी गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. खरगे यांचा भाजपच्या उमेश जाधव यांनी 95,452 मतांनी पराभव केला. अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीत खरगे यांचा हा पहिलाच निवडणुकीतील पराभव होता. राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे व्यवस्थापन आणि इंडिया ब्लॉकशी समन्वय साधण्याची भूमिका बजावणारे खरगे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दोड्डामणी हे व्यापारी असून शैक्षणिक संस्थाही सांभाळतात.
'भाजप संविधानाच्या विरोधात बोलत आहे'
खरगे म्हणाले की, 'फसवू नका, भाजप फसवे आहे, ते खोटे बोलतात. ते सत्य लपवतात आणि लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवतात. जनतेला संघटित राहून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले होते. जर संविधान, स्वातंत्र्य आणि एकता नसेल तर हा देश पुन्हा गुलाम होईल आणि पुन्हा उभा राहू शकणार नाही. भाजप आजकाल संविधानाच्या विरोधात बोलत आहे.' असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
'मग भाजप कारवाई का करत नाही?', खरगेंचा सवाल...
खरगे म्हणाले, 'हा तुमच्या हक्काचा विषय आहे. भाजप राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा भाजप करत असला तरी अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण अशी विधाने करणाऱ्या लोकांच्या मागे ते आणि RSS उभे आहेत.'
ADVERTISEMENT