जम्मू-काश्मीर: सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल असताना त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देण्याचं आमिष दाखविण्यात आलं होतं. याचीच आता सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. (cbi summons former governor satya pal malik who criticized pm modi over pulwama attack)
ADVERTISEMENT
सत्यपाल मलिक यांनी इंडिया टुडे/आज तकला सांगितले की, सीबीआयने त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. ‘भ्रष्टाचाराच्या या प्रकरणी त्यांना माझ्याकडून काही गोष्टींवर स्पष्टीकरण हवे आहे. त्यांनी मला माझ्या सोयीनुसार 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास तोंडी सांगितले आहे.’ मात्र, अद्यापपर्यंत सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.
रिलायन्स इन्शुरन्स प्रकरणी सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसने ट्विट केले की, ‘शेवटी पंतप्रधान मोदींसोबत राहावलं नाहीच. सत्यपाल मलिक यांनी देशासमोर त्यांचं पितळ उघडं पाडलं. आता सीबीआयने मलिक यांना बोलावले आहे. हे तर होणारच होतं.’
काय आहे प्रकरण?
सत्यपाल मलिक यांना 2018 मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यातं आलं होतं. मलिक यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले. यानंतर त्यांना मेघालयात राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. परंतु दरम्यान, 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 दरम्यान जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना दोन फाईलींना मंजुरी देण्यासाठी त्यांना तब्बल 300 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता.
हे ही वाचा>> “मुख्यमंत्रीपदावर आताच दावा करू शकतो”, बंडाच्या चर्चानंतर अजित पवारांचं मोठं विधान
याबाबत त्यांनी असं सांगितलं होतं की, काश्मीरमध्ये गेल्यानंतर दोन फाईल्स त्यांच्याकडे मंजुरीसाठी आल्या होते. यातील एक फाइल अंबानींची होती आणि दुसरी आरएसएसच्या एका व्यक्तीची होती. जी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील मागील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होते आणि पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांच्या खूप जवळ असल्याचा दावा करत होते.
हा घोटाळा असल्याची माहिती मला दोन्ही विभागांच्या सचिवांनी दिली आणि त्यानुसार मी दोन्ही करार रद्द केले, असे मलिक म्हणाले होते. प्रत्येक फाईल पास करण्यासाठी तुम्हाला 150 कोटी रुपये मिळतील, असे सचिवांनी सांगितले होते, असेही मलिक यांनी सांगितले होते.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी पंतप्रधान मोदींवर नेमकं काय आरोप केलेले?
सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला होता. सत्यपाल मलिक यांनी मुलाखतीत म्हटले होते की, सीआरपीएफने ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही.’
सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, ‘विमान उपलब्ध झाले असते तर हल्ला झाला नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच मी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की, आपल्यामुळे शहीद जवानांचे प्राण गेले. यावर पंतप्रधानांनी मला शांत राहण्यास सांगितले.’
‘हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते, पंतप्रधान मोदींना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी पार्कमधून बाहेर आल्यावर एका ढाब्यावर मला कॉल केला. तेव्हा सांगितले की, मी अत्यंत दुःखी आहे असं म्हणत सत्यपाल मलिक यांनी संपूर्ण हकीकत पंतप्रधानांना सांगितली. मात्र, पंतप्रधानांनी हे पुढे कोणालाही सांगू नये असं म्हटलं.’
हे ही वाचा>> “निवडणुकीमुळे…”, 14 श्री सदस्यांच्या मृत्यूवरून शरद पवार संतापले, शिंदेंवर घणाघात
सत्यपाल मलिक म्हणाले की, ‘त्यांना हीच गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही सांगितली. डोभाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले. डोभाल माझा वर्गमित्र आहेत. त्यामुळे तो माझ्याशी काहीही बोलू शकतो. त्याने देखील सांगितलं की, सत्यपाल भाई याबाबत काहीही बोलू नका.’
सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, ‘त्यांच्या अधिकारात असते तर त्यांनी सीआरपीएफला विमाने उपलब्ध करून दिली असती कारण केवळ पाच विमानांची गरज होती.’
हे ही वाचा>> ‘निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा घडवलं?’, सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक आरोपानंतर राऊतांचा हल्लाबोल
या खुलाशांवर सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेणाऱ्या करण थापर यांनी पुन्हा विचारले की, ‘त्यांना पंतप्रधान मोदींनी गप्प राहण्याचा सल्ला दिला होता का? याचाच अर्थ पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न झाला.’ यावर सत्यपाल मलिक यांनी सहमती दर्शवत पुढे सांगितले की, याप्रकरणी सर्व दोष पाकिस्तानवर टाकून मोदी सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर गेले आहे.’ असे अत्यंत गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केले होते.
सत्यपाल मलिक यांच्या याच गंभीर आरोपानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर तुफान टीका करण्यास सुरुवात केली होती. अशातच आता मलिक यांना सीबीआयचं समन्स आल्याने आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.
ADVERTISEMENT