बाबरी मशीद प्रकरणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याला निमित्त ठरलं आहे भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी काहीही संबंध नव्हता, असं ते म्हणाले. पण, यावरून कोंडी झाली आहे ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची. कारण ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनाला घेरलं असून, संजय राऊतांनी थेट सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक विधान केलं. ज्यावरून आता ठाकरे गटाने शिंदे गटाला घेरलं आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले. ते आधी बघूयात…
बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील या मुलाखतीत असं म्हणाले की, “ढाचा पडल्यानंतर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय, बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का, शिवसेना तिथे गेली होती? का, बजरंग दल तिथे होता. कारसेवक कोण होते? कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की आम्ही बजरंग दलाचे नाव घेणार नाही. ना आम्ही शिवसेनेचे आहे. वेगळे आहोत, असं म्हणणारे कुणी नव्हतं.”
हेही वाचा >> दंगलीनंतरचा तो काळ, शिवसेनेची हमी आणि झहीर मुंबईतच राहिला!
“सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की, हेच करतील आणि केलं ते. बाबरी ज्यांनी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते. मी गेलो. महिनाभर मला नेऊन ठेवलं होतं. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, विधान परिषदेत असणारे हरेंद्र कुमार आणि मी, असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस होतो विद्यार्थी परिषदेचे. आम्हा तिघांना तिथे ठेवलं होतं.”
“संध्याकाळची सभा, संतांची व्यवस्था, हे सगळं. असं सांगितलं गेलं होतं की, शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत… काहीही होवो… ढाचा पडो वा न पडो… सगळे बाहेर पडल्यानंतर तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं. जेव्हा आम्ही तिघं बाहेर पडलो, तेव्हा कुत्री भुंकत होती अयोध्येच्या रस्त्यावर”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या त्या भूमिकेवर चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला प्रश्न
पुढे पाटील असंही म्हणाले की, “अशा वातावरणात काम केलेले आम्ही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणून तुम्ही काय तुमचे चार सरदार पाठवले होते का तिथे?”, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या त्या विधानावर उपस्थित केला.
चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर संजय राऊतांनी शिंदे गटाला काय म्हटलं आहे?
चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना सवाल केला आहे.
संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात ते म्हणतात, “आता प्रश्न हाच आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा ४0 मिंधे काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येत जाऊन आले. साहेबांच्या अपमानाविरोधात कोण दांडका उचलणार? नालायक लेकाचे!गुलाम!”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT