Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांनी जळगावातील वचनपूर्ती सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झालेत. घरकोंबडा संबोधत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.
ADVERTISEMENT
जळगावातील सभेत शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. फडणवीसांना हिणवत टीका केल्याने भाजपकडून प्रतिक्रिया उमटली आहे.
उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर काय?
भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल; कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही ‘हपापले होते आणि आहात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसजींवर केलेली वैयक्तिक टीका भाजप सहन करणार नाही.”
हेही वाचा >> India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची
“देवेंद्रजींनी कायम महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला, उद्धव जी, तुमच्या सारखं ‘घरकोंबडा‘ बनून केवळ मातोश्रीची रखवाली केली नाही. तुम्ही स्वार्थासाठी सोनिया गांधींपुढे मुजरा केला पण देवेंद्रजींनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही”, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे.
हेही वाचा >> डेबिट कार्डची लागणार नाही गरज, UPI द्वारेच ATM मधून काढता येणार पैसे!
आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावरून निशाणा
“कोविडमध्ये महाराष्ट्र झुंजत असताना तुम्ही ‘घरकोंबडा‘ होऊन फेसबुक लाईव्ह करत होतात. तेव्हा देवेंद्रजी रुग्णालयात जाऊन लोकांना धीर देत होते. देवेंद्रजी सत्तेत असो की विरोधात कायम जनहिताचा विचार करतात. तुम्ही मात्र सत्तेत असताना शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. सत्ता असताना तुम्हाला कधी जळगाव दिसलं नाही. आज मात्र सत्ता गेल्यामुळे जाग आली. पण लक्षात ठेवा जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला.
ADVERTISEMENT