मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात (Maharashtra Bhushan award ceremony) ज्या 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला त्यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणावरून विरोधक हे सावध भूमिका घेताना दिसत होते. मात्र, या प्रकरणी शिंदे सरकारला (Shinde Govt) खिंडीत गाठण्याची संधी मिळताच आता विरोधकांनी देखील शड्डू ठोकला आहे. झालेली ही घटना दुर्दैवी असून ती सदोष मनुष्यवधाची आहे. त्यामुळे या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी थेट राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली असून त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रही लिहलं आहे. (death in maharashtra bhushan event due to heat stroke or stampede congress demands to convene 2 day special session of legislature in case of kharghar tragedy)
ADVERTISEMENT
दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची नाना पटोलेंनी केली मागणी, पाहा पत्रात नेमकं काय म्हटलंय:
खारघर येथे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही लाखो श्रीसदस्यांना मात्र कडक उन्हात तासन तास बसावे लागले, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे १४ श्रीसदस्यांचे मृत्यू झाले आहेत व ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, सरकार मात्र सत्य परिस्थिती लपवत आहे.
खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे. या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करुन घेऊ पहात आहे. जेव्हा की, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे.
महोदय, खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार सत्य परिस्थिती दडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्य सरकारला आपण द्यावेत, अशी आमची विनंती आहे. असं पत्र नाना पटोले यांनी राज्यपालांना लिहिलं आहे.
काँग्रेस २४ तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचे सत्य सांगणार:
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे. या सरकारला जनाची नाही तर मनाची असती तर आतापर्यंत राजीनामे दिले असते पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे परंतु काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे.’ असंही नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
आता या प्रकरणात सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि त्याबाबत नेमकी कोणावर कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, यावेळी राज्यपाल नाना पटोलेंनी जी मागणी केली आहे त्यावर काय कारवाई करतात त्याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे.
खारघरमध्ये नेमकी काय घटना घडलेली?
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सोहळ्यात उपस्थित असलेल्या 11 श्रीसदस्यांचा रणरणत्या उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर 24 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 25 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृत कुटुंबीयांना सरकारच्यावतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच सर्व उपचार घेणाऱ्या श्रीसदस्यांचा मोफत इलाज करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जखमींपैकी काही जणांवर खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटल, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल, वाशी येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
रविवारी नवी मुंबईजवळील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 25 लाख श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती.
ADVERTISEMENT