Vidhan Parishad Election : क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 'ते' आठ आमदार कोण?

मुंबई तक

14 Jul 2024 (अपडेटेड: 14 Jul 2024, 11:49 AM)

Maharashtra MLC Election : काँग्रेसच्या आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती. महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीला पाठवला अहवाल. आठ दिवसांत कारवाई होण्याची शक्यता

क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे आठ आमदार कोण आहेत?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटली असल्याची माहिती आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग

point

काँग्रेसच्या आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती

point

महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीला अहवाल पाठवला असून, कारवाईची शिफारस केली आहे

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली घडताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची तब्बल आठ मते फुटली आहेत. यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी रात्रीच दिल्लीला पाठवला असून, पक्षविरोधी कृती केल्याबद्दल कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे. (Sources told that Eight Congress MLAs Did Cross Voting in Vidhan Parishad Election 2024)

हे वाचलं का?

महाविकास आघाडीने तीन उमेदवार विधान परिषद निवडणुकीत उतरवले होते. मविआची मते फोडण्यात महायुतीला यश आले. यात सर्वाधिक मते काँग्रेसची फुटल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >> मनोज जरांगेंचा सरकारला नवीन अल्टिमेटम, 'या' तारखेला पुन्हा... 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसची तब्बल आठ मते फुटली आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याबद्दलचा संताप व्यक्त केला. दरम्यान, ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे, त्यांच्याबद्दलचा अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीला पाठवला असल्याची माहिती आहे. 

मते फुटली, कोणत्या आमदारांची नावे आहेत चर्चेत?

राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या काही आमदारांच्या नावांची दबक्या आवाजात चर्चा आहे. यात झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर आणि मोहन हिंबर्डे या आमदारांच्या नावांची चर्चा सर्वाधिक आहे. मात्र, ते आठ आमदार कोण हे काँग्रेसकडून कारवाई करण्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

हिरामण खोसकर यांनी केला खुलासा

दरम्यान, हिरामण खोसकर यांनी खुलासा केला आहे. "दोन दिवसांपासून माझी बदनामी सुरू आहे. ती थांबली पाहिजे. वरिष्ठांनी थांबवली पाहिजे. विधान परिषदेत आम्हाला ठरवून दिलेले मतदान. सात जणांनी मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचे आणि उर्वरित मतदान जयंत पाटलांना करायला सांगितले होते."

हेही वाचा >> भाषण करत असतानाच ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या, बघा व्हिडीओ

"उद्धव ठाकरेंचे १६ आणि काँग्रेसचे ७ असे २३ मते होतात. यात एक मत कुणाचे फुटले, हे वरिष्ठांनी कोर्टाचे आदेश घेऊन मतदान चेक केले पाहिजे. पहिल्या पसंतीचे मतदान मी मिलिंद नार्वेकरांना दिले. दुसऱ्या पसंतीचे मतदान जयंत पाटील यांना दिले. तिसऱ्या पसंतीचे मतदान प्रज्ञा सातव यांना दिले. व्यवस्थित मतदान केले आहे. त्यामुळे माझी बदनामी चुकीची आहे", असे खोसकर यांनी म्हटले आहे.

...म्हणूनच काँग्रेसने निवडणूक लढवली -विजय वडेट्टीवार

"जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली. पक्षातील बेइमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधान परिषद निवडणूक लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल. कालच्या निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात आला आहे. दोषींवर कारवाई होईल", असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

    follow whatsapp