Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले व ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना 21 फेब्रुवारी रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे 3.02 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते. बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे नियोजित कार्यक्रम होते, मात्र मनोहर जोशींच्या निधन झाले समजताच ठाकरेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. 'शून्यातून विश्व निर्माण करणारे, कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन' अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही मनोहर जोशी यांच्या जुन्या आठवणी सांगत त्यांनी त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. कुटुंबीप्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले अशी शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी मनोहर जोशी यांचा नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी राजकीय जीवनात पूर्ण केले असं सांगत विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती आणि मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त करत मुंबईचे महापौर ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास कायम स्मरणात राहिल अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
शरद पवार गटाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी ही वेदनादायी आहे. 'जोशी सर शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते तर होतेच पण शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख होती अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 'माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्व बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉ. मनोहर जोशी यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केले. अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती.' अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करताना,'शिवसेनेच्या स्थापनेपासून अखेरपर्यंत कार्यरत असलेले आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले, एक खंबीर, विचारी आणि शिस्तबध्द नेतृत्व मनोहर जोशी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. बाळासाहेबांचा आदेश शिरोधार्य मानून पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. नगरसेवक, मुंबईचे महापौरपद, आमदार, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर नव्वदच्या दशकात राज्यात प्रथमच भाजपसोबत सत्तेत आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्रीपद आणि पुढे लोकसभेचे सभापती अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द आहे.' या शब्दात त्यांनी त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ही दुःख व्यक्त करत महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला या शब्दात त्यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी यांनीही सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT