Rohit Pawar Meet Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सामील झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह त्यांच्या गटाकडे गेले. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला. तर, शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं आहे. अशावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर रोहित पवारांनी पहिल्यांदाच त्यांचे काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
ADVERTISEMENT
काका-पुतणे एकत्र! भेटीचं नेमकं कारण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकांचं आयोजन पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. या बैठका दुपारी बारा वाजेपर्यंत चालतील. यादरम्यान पुणेकरांसाठी महत्त्वाची कालवा समितीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यातील सर्किट हाऊस उपस्थित होते. इथे पाणी प्रश्नावर या तिघांमध्ये चर्चा झाली.
'... अशी विनंती करण्यासाठी हजेरी लावली', सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या!
या बैठकीला सुप्रिया सुळे हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागचं कारण स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, 'कालवा समितीची बैठक असल्याने मी बैठकीला आले. दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या भागातील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. या भागातील पाणी प्रश्नावर गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करण्यासाठी बैठकीला हजेरी लावली.'
ADVERTISEMENT
