‘आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा’, असं संतप्त विधान केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. उमेश खाडे आणि त्याच्या आईवडिलांना अटक केल्याची माहिती देत आव्हाडांनी सरकारवर टीकेचा प्रहार केला.
ADVERTISEMENT
‘चोर आले, पन्नास खोके घेऊन चोर आले’, या रॅप साँगमुळे राज मुंगासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका कलाकाराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
‘उमेश खाडेला लगेच सोडा’, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, “भोंगळी हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरिबीवर तो या गाण्यामध्ये व्यथित होऊन बोलला आहे.”
आव्हाड म्हणतात, “आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा. अशा किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अशा प्रकारे दाबू शकत नाही.”
हेही वाचा >> साईबाबांवरील टीकेवरुन जितेंद्र आव्हाडांनी बागेश्वर बाबांची लायकी काढली
“हे पोलिसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही, असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोरा-पोरींनो व्यक्त व्हा… फासावर लटकवणार का? मी कायम तुमच्या बरोबर आहे. आपला गळा दाबत आहे. तुकाराम जेलमध्येच बसले असते. ह्यांनी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते. विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणु रेणूत आहे”, असा इशारा दिला.
आव्हाड ठाण्यात घेणार रॅपर्सचा कार्यक्रम
जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “मी सगळ्या रॅपर्सला एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार. आपल्या भाषेत व्यक्त होणे, हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विद्रोह हा बुद्धापासून तुकारामापर्यंत सगळ्यांनी केला. शीव, शंभू, फुले, आंबेडकरांनीही विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिली”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
उमेश खाडे यांच्या गाण्यात नेमकं काय?
मराठी रॅपर उमेश खाडे याने महागाई, बेरोजगारी आणि गरिबीबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय नेते कशा पद्धतीने घोषणा करून सर्वसामान्य माणसांना आशेला लावतात आणि निवडून येतात. मात्र, त्यानंतर सर्वसामान्यांच्या आयुष्यातील प्रश्न तसेच राहतात. यावरच उमेश खाडे तिखट भाषेतून भूमिका मांडली आहे.
राज मुंगासेविरुद्ध कुणी दिली तक्रार?
अंबरनाथ पूर्वमधील शिवसेनेच्या युवा सेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे यांनी तक्रार दिली होती. राज मुंगासे या तरुणाने चोर आले पन्नास खोके घेऊन चोर आले… अशा आशयाचे आक्षेपार्ह बदनामीकारक सरकारच्या विरोधात रॅप बनवले. भाजप शिवसेना सरकारची बदनामी होईल असे रॅप साँग बनवण्यावर आक्षेप घेत स्नेहल कांबळेंनी तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
ADVERTISEMENT