Amit Shah Tweet: मुंबई: श्री सद्गुरू परिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना काल (16 एप्रिल) नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा भर उन्हात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्री सदस्य आले होते. पण उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. आता याच प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तब्बल 24 तासांनंतर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra bhushan award amit shah reacts after almost 24 hours on the death of 12 shri members)
ADVERTISEMENT
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे खास दिल्लीहून मुंबईत आले होते. अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला जावा अशी शिंदे सरकारची इच्छा होती. त्यामुळेच अमित शाह देखील त्या विनंतीला मान देऊन खारघर येथे आले होते.
हे देखील वाचा- महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?
या कार्यक्रमाला लाखोंची गर्दी पाहून अमित शाह हे देखील अचंबित झाले होते. यावेळी अमित शाह यांनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीचं कौतुक केलं होतं. त्यावेळी स्वत: अमित शाहांनी उन्हाच्या झळा सोसत भाषण ऐकत बसलेल्या श्री सदस्यांबद्दल भाष्य केलं होतं.
पाहा महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उन्हाच्या झळा सोसणाऱ्या श्री सदस्यांबाबत अमित शाह नेमकं काय म्हणाले होते:
‘दोन दिवसांपासून आप्पासाहेबांना दिला जाणारा पुरस्कार प्रदान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांना माझा नमस्कार.. मी आज या सार्वजनिक मंचावरून सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा न ठेवता सार्वजनिक जीवनात समाजसेवा करणाऱ्या.. समाजसेवकाच्या सन्मानासाठी या लाखो-लाखो लोकांची अलोट गर्दी मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नाही.’
हे देखील वाचा- ‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?
‘जिथवर नजरही पोहचू शकत नाही एवढी गर्दी आहे. एवढं मोठं मैदान.. मध्ये एक रोड.. रोडनंतर दुसरं मैदान आणि अंगाची लाही लाही करणारी 42 अंशाची उष्णता, आग ओकणारा सूर्य.. या सगळ्यामध्ये मोकळ्या आकाशाखाली बसलेले आपण सर्व सदस्य.. मात, बंधू-भगिनी हे दशर्वतात की, आपल्या मनात आप्पासाहेबांसाठी किती मान-सन्मान आणि भक्तीभाव आहे.’
‘अशा प्रकारचा मान-सन्मान आणि भक्तीभाव केवळ आणि केवळ त्याग, समर्पण आणि सेवेतूनच उभा राहतो. जो आप्पासाहेबांच्या आत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो.’ असं अमित शाह हे आपल्या भाषणात म्हणाले होते.
हे देखील वाचा- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; 11 जणांचा मृत्यू, CM शिंदेंनी सांगितलं कारण
दरम्यान, अमित शाहा यांच्या या भाषणानंतर अवघ्या काही तासातच याच कार्यक्रमातील श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. मात्र, याबाबत तब्बल 24 तासांनंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणाले की, ‘काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.’
आता अमित शाहांच्या या ट्विटनंतर अनेक जण प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर आणि शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. अशावेळी आता याप्रकरणी सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT