Medha Kulkarni : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप होत आहेत. या घटनेनंतर सर्वच पक्षाच्या लोकांनी आक्रमक आंदोलन केलं होतं. यादरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घैसास यांच्या नर्सिंग होममध्ये जाऊन तोडफोड केली होती. मात्र, यावरुन आता भाजपमध्येच अंतर्गत कलह सुरू झाल्याचं दिसतंय. कारण आता ज्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली, त्यांना भाजपच्याच खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रातून सडेतोड टीका केली आहे.
ADVERTISEMENT
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
पुणे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना मेधा कुलकर्णी यांनी हे पत्र लिहिलं आहे. "डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेलं हे मोडतोडीचं व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे" असं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते असंही त्या म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा >> सोवळं-जाणवं नसल्यानं रामदास तडस यांना रोखलं, रामनवमीच्या दिवशी मंदिरात काय घडलं?
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
चित्रा वाघ यांनी या घटनेचं समर्थन केलं होतं. "भले शाब्बास ऽऽऽऽमाझ्या रणरागिणींनो …ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉ. घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला. बेरड आणि माणुसकीने मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही पण त्या लेकरांना न्याय मिळायलाच हवा." असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
नुकसान भरपाई व दिलगिरी व्यक्त करा...
हे ही वाचा >> हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही असाही टोला मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पत्रामधून मारला आहे. राजकीय व्यक्तींच्या कृतीला विचारांची जोड असावी, सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजे. हे समजावून सांगण्याचं काम तुम्ही शहर अध्यक्ष म्हणून कराल अशी आशा करते सं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. तसंच नुकसान भरपाई व दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल असंही त्या म्हणाल्या आहेत. ट
त्यामुळे एकीकडे भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ज्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं होतं, त्यांचाच समाचार भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
