Maharashtra Polictical Crisis, Congress : अजित पवारांनी बंड करुन ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी केलेल्या खेळीमुळे राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलली. अजित पवारांच्या बंडाचा काहींना फायदा झाला, तर काहींची धाकधूक वाढली. या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस वेट अण्ड वॉचच्या भूमिकेत होती. शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीत देखील दोन गट पडल्याने आता काँग्रेसने आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तो डाव नेमका काय आहे, तेच आपण समजावून घेऊयात…
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत देखील शिवसेनेसारखी फुट पडल्याचं स्पष्ट आहे. अजित पवार आता आम्हीच खरा पक्ष असा दावा देखील करत आहे. सरकारमध्ये सहभागी होण्याआधी शुक्रवारीच अजित पवारांनी त्यांच्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते पद आता रिक्त झालं आहे. अजित पवारांनी रविवारी तातडीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ही सगळी घडमोड घडताच जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे व्हिप ची जबाबदारी देखील जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली.
विरोधी बाकावरील समीकरणं बदलणार
असं असलं तरी विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला नाही, तर विधानसभा अध्यक्षांना असतो. त्याचबरोबर ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता नेमला जातो. अशा स्थितीत सध्या कोणाकडे किती आमदार आहेत ते पाहुयात.
वाचा >> ‘…मग सत्तेत राहायचं कशाला?’, अजित पवारांची एन्ट्री, संजय शिरसाट काय बोलले?
राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत. त्यातील शरद पवारांकडे 16 आमदार आहेत तर अजित पवारांकडे 24 आमदार असल्याचं दावे केले गेलेत. भूमिका न घेतलेले असे 13 आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचे विधानसभेमध्ये 45 आमदार आहेत.
आता अजित पवारांकडील 24 आमदार सत्तेत दाखल झाले तर पवारांकडे केवळ 16 आमदार उरतात. आता तटस्थ असलेले आमदार जरी पवारांसोबत आले तरी त्यांची संख्या काँग्रेसपेक्षा कमी होते. त्यामुळे पवारांपेक्षा काँग्रेसचे आमदार अधिक असल्याचं स्पष्ट होतं, आणि त्यामुळे विरोधीपक्ष नेते पद हे काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या गटात काय सुरूये खलबतं?
काँग्रेसने देखील आता विरोधीपक्ष नेते पदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी देखील ‘राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचं विधानसभेच संख्याबळ अधिक असेल तर काँग्रेसचा विरोधीपक्ष नेता होईल’ असं जाहीर केलं. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील विधानसभेचा नियम सांगत ‘ज्यांची संख्या जास्त त्यांचा विरोधीपक्ष नेता होईल’ असं जाहीर केलंय. त्यामुळे काँग्रेस विरोधीपक्ष नेते पदावर दावा करण्यास सज्ज झाली आहे.
दुसरीकडे शरद पवारांनी देखील याबाबत भाष्य केलं. ‘काँग्रेसकडे विधानसभेत आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांनी जर विरोधीपक्ष नेते पदावर दावा केला असेल तर त्यांची ती मागणी रास्त आहे’, असं पवार पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यामुळे पवारांनी देखील काँग्रेसची संख्या अधिक असल्याचे मान्य केले आहे.
वाचा >> भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
पुढच्या काही काळात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील असणार आहे. या अधिवेशनात विरोधीपक्ष नेते पदाची निवड देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्यास त्यांना ते मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या फुटीचा काँग्रेसला मात्र फायदा झाल्याचं चित्र आहे.
दरम्यान विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. अशावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे कुठलंही मोठं पद राहणार नाही. त्यामुळे येत्या काळात काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT