Om Birla Lok Sabha Speaker : 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या कोडिकुन्निल सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. दोन्ही उमेदवारांच्या नावांचे प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आले. त्यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी ओम बिर्ला यांना विजयी घोषित केले.
ADVERTISEMENT
लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी म्हणून सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले.
विरोधकांकडून लोकसभेच्या उपाध्यपदाची मागणी करण्यात आली. ही मागणी भाजपकडून नाकारण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला.
इंडिया आघाडीकडून के. सुरेश होते रिंगणात
उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून चर्चा फिस्कटल्यानंतर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी मांडला होता.
पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केले अभिनंदन
लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले.
ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. येत्या पाच वर्षात तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाचा आवाज या सभागृहात ऐकला जावा, असे म्हणत राहुल गांधींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.
ADVERTISEMENT