Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi : एकीकडे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये असणार की नाही याबाबत काही ठरलेलं नसताना दुसरीकडे राहुल गांधींनी थेट प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहीत भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. या पत्राच्या निमित्ताने आंबेडकरांकडे आयतीच संधीच चालून आली आणि त्यांनी काँग्रेसला कात्रीत पकडलं. आता राहुल गांधींनी जरी निमंत्रण पाठवलं असलं तरी प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या यात्रेला जाणार नाहीयेत, नेमकं काय घडलं हेच समजून घ्या…
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधींकडून भारत न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मणिपूरमधून सुरु झाली असून तिचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधींकडून निमंत्रण आल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर राहुल गांधींच्या या निमंत्रणाला प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत उत्तर देखील दिलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी काय दिलं उत्तर?
प्रकाश आंबेडकरांनी दोन पानी पत्र लिहीलं असून त्यात त्यांनी वंचितची सविस्तर भूमिका मांडली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की ‘मला राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणं अवघड वाटतंय कारण अद्याप वंचितला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे काही अटी ठेवून मी हे निमंत्रण स्वीकारत आहे.’
हेही वाचा >> ‘राम दर्शनासाठी अयोध्येला येईन, पण…’; पवारांनी भूमिका केली जाहीर
‘इंडिया आघाडीमध्ये वंचितचा सहभाग झालेला नसताना या यात्रेत सहभागी होणं म्हणजे वंचित इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे अर्थ काढले जातील. त्यामुळे माझी राहुल गांधींना विनंती केली आहे की त्यांनी वंचितला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवावं’, अशी अटच आंबेडकरांनी काँग्रेसला घातली आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना प्रस्ताव; म्हणाले ‘आम्ही पाठिंबा देऊ’
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत तिनही पक्षांचे एकमत झालं आहे. परंतु अद्याप वंचितला मविआमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये, आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी थेट राहुल गांधींनाच याबाबतची आठवण करुन दिली आहे. आता आंबेडकरांच्या या भूमिकेला काँग्रेसकडून काही उत्तर येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT