Ajit Pawar News Today : “शरद पवार यांचं राजीनामा सुरू असतानाच अजित पवार यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठका सुरू होत्या. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरी गटाचा याला विरोध होता आणि आहे”, असा धक्कादायक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. (Prithviraj Chavan claim that RSS and Nitin Gadkari camp against to Ajit Pawar.)
ADVERTISEMENT
‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक खळबळजनक बाबी मांडल्या. राष्ट्रवादी झालेल्या बंडाबद्दल त्यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार होती, हे स्पष्ट होते. अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू होता. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला, त्यानंतर जे घडले त्यावेळी अजित पवार पक्ष सोडून जात आहेत, असे त्यांना वाटत होते. मग सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी दिली तर काय होऊ शकते याची चाचपणी केली. मात्र, अजित पवार सोडून जात नाहीत, असे शरद पवारांना कळले, तेव्हा ते मागे आले”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
अजित पवार-अमित शाह यांच्यात बैठका
“सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपवण्याचे सूत्र आणले गेले. हा संघर्ष सुरू होता, त्याच वेळी अजित पवार यांच्या थेट अमित शाह यांच्याबरोबर बैठका सुरू होत्या. मध्यस्थी प्रफुल पटेल करीत होते”, असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
व्हिडीओ >> ‘अजित पवारांचं राजकीय मरण नक्की’, शरद पवारांबद्दल शालिनीताई पाटील काय बोलल्या?
“अजित पवारांचे पहिल्यापासून म्हणणे होते की, मला मुख्यमंत्री करा, पण ही कटू गोळी घ्यायची का? अजित पवार यांना स्वीकारायचे का? असा प्रश्न होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरी गटाचा त्याला विरोध होता आणि आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे की नाही, हा वाद अजून आहे”, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
वाचा >> शरद पवारांचा अजितदादांना भीमटोला, म्हणाले, ‘भानगडीत…’
“माझी माहिती आहे व दिल्लीतही तशी कुणकुण आहे की, 10 ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदेंच्या प्रकरणात निकाल द्यावा लागेल. शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू न्यायालयातही गेले आहेत. 10 ऑगस्ट यासाठी की सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांकडे प्रकरण सोपवले. 11 मे रोजी निकाल दिला, त्याला आता तीन महिने होत आहेत. 90 दिवसांत निकाल दिला पाहिजे असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पुढच्या दोन महिन्यात काही तरी घडेल; चव्हाणांचं राजकीय भाकित
पृथ्वीराज चव्हाण असंही म्हणाले की, “अजित पवारांना काहीही करून पद हवे होते. शरद पवारांना अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवायचे नव्हते. त्यांना जयंत पाटील यांच्याकडे पद सोपवायचे होते. पण, अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. भाजपमध्ये त्यांना मुख्यमंत्री करण्याबद्दल काय ठरले असेल, त्याचे त्या पक्षात काय परिणाम होती, संघ फक्त पाहात राहील का? आणि शिंदे गटाचे काय होईल असे प्रश्न आहेत. आगामी दोन महिन्यांत काही तरी घडेल असं मला वाटतं”, असं राजकीय भाकित पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
