Raj Thackeray on Nitin Gadkari : टोल नाका तोडफोडीवरून भाजप आणि मनसेत चांगलाच कलगीतुरा रंगलाय. आज याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. इतकंच नाही, तर राज ठाकरेंनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT
राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी त्यांनी काही मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांना टोल नाका तोडफोड प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरेंनी याला उत्तर दिलं. ते म्हणाले, “जसं मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंनी संरक्षण कडे लावण्यात आले. तसे समृद्धी महामार्गावर कुठेही केलेलं नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत अपघातात जवळपास 400 लोक मृत्यूमुखी पडलेत. याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? जाळे न लावता महामार्ग सुरू केला आणि जनावरं रस्त्यावर येताहेत. लोक वेगाने गाड्या घेऊन जातात आणि अपघातात मरतात. काही खबरदाऱ्या घेणं, ही सरकारची जबाबदारी नाहीये का? पण, तुम्ही आधी टोल बसवताहेत. लोकांच्या जगण्या मरण्याची काही काळजी नाही. पण, टोल पाहिजे.”
मुंबई-गोवा महामार्ग, राज ठाकरेंचा रोकडा सवाल
“रस्त्यांची परिस्थिती बघा किती घाणेरडी आहे. लोकांना टोलवर सहा-सहा तास लागताहेत. आमचे एक मित्र नाशिकवरून येत होते. त्यांना सात तास लागले. खड्डे पडलेत. वाहतूक कोंडी होतेय. तुम्ही कसला टोल वसूल करता आहात? यावर भाजप काही बोलणार आहे का? 17 वर्षांपासून मुंबई-गोवा रस्ता सुरू आहे. 17 वर्षे लागतात का?”, असा रोकडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
वाचा >> ‘एनडीए अमिबा, मोदींची जेवणावळ’; INDIA च्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला हल्ला
राज ठाकरे गडकरींबद्दल काय बोलले?
“एका ठिकाणी रस्ता बनवायचा, दुसऱ्या ठिकाणी बनवायचा नाही. बनवलेला रस्ता खराब होतो. हे किती काळ चालणार? मला कळत नाही की, देशातील रस्ते बांधणी करणारा केंद्रातील मंत्री मराठी आहे. महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी नितीन गडकरींच्या खात्याबद्दल संताप व्यक्त केला.
“मनसेमुळे 65 टोलनाके बंद झाले. त्याचं कौतुक नाही करणार कधी? पण, गंमत म्हणजे जे टोलमुक्त महाराष्ट्र करणार होते, त्यांना एकही प्रश्न विचारत नाही”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
वाचा >> Rajyasabha: ‘त्या’ खासदारावरुन राडा… जाणून घ्या खासदार कधी आणि कसे होतात निलंबित?
‘नितीन गडकरी मोठंमोठे आकडे सांगत असतात, मग इतका अभ्यास असणाऱ्या माणसाचं हे अपयश समजायचं का?’ असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील अपयशच आहे. मुंबई-गोवा रस्त्याला 17 वर्ष लागतात. 17 वर्षे कशाला म्हणतात? एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे अमेरिकेतील. ती इतकी उंच इमारत 14 महिन्यात बांधलीये.”
‘रामायणातील लोक पुढारलेले असावेत’
“प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. ते दंडकारण्यात गेले. तिथे राहताना राम हरणाच्या शिकारीला गेले. साधूला आला आणि सीतेने लक्ष्मणरेषा पार केली आणि साधू तिला लंकेत घेऊ गेला. तिथे सेतू बांधण्यात आला. मग सगळे तिथे गेले. लढाई झाली. मग राम 12 वर्षांनी पुन्हा अयोध्येला आले. वांद्रे वरळी सी लिंकला 10 वर्ष लागली. रामायणातील मुख्य कथा 12 वर्षात घडलीये आणि आमच्याकडचा एक सेतू बांधायला 10 वर्षे लागली. मुंबई-गोवा रस्त्याला 17 वर्षे झाली, अजूनही झालेला नाही. तेच बहुदा पुढारलेले होते”, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.
ADVERTISEMENT