Raju Shinde join Udhhav Thackeray Shiv Sena UBT : लखन आदाटे, मुंबई : छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठे डावपेच खेळायला सुरुवात केली आहे.लोकसभेला झालेल्या पराभवाची परतफेड विधानसभा निवडणुकीतून करण्याचा चंगच ठाकरेंनी बांधलाय. संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदेंनी (Raju Shinde) आज ठाकरे गटात प्रवेश केला. ना आमदार, ना खासदार, प्रदेश पातळीवर कोणतंही मोठं पद नसलेल्या राजू शिंदेंसाठी थेट ठाकरे उपस्थित होते ही बाब खूप महत्वाची आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाने संभाजीनगरमधील गणित कशी बदलणार आहेत? राजू शिंदेंच्या ठाकरे (Udhhav Thackeray) गटातील प्रवेशाने कुणाला फटका बसणार आहे? हे जाणून घेऊयात. (raju shinde join udhhav thackeray shiv sena ubt chhatrapati sambhaji nagar bjp blow)
ADVERTISEMENT
संभाजीनगरमधील राजकारणाची राज्यभर चर्चा होत असते. आताही विधानसभा निवडणुकीआधी संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. संभाजीनगरमधील संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरलेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी नवे चेहरे सोबत घ्यायला सुरुवात केली आहे. राजू शिंदेंसारखा हुकमी एक्का पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी भाजपला धक्का दिलाय. मात्र याचा फटका थेट शिंदे गटालाही बसणार आहे. आता राजू शिंदेंमुळे आमदार संजय शिरसाट यांची अडचण कशी वाढणार आहे ते पाहूयात.
हे ही वाचा : Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी घेतले ताब्यात, कारण...
2019 च्या निवडणुकीत राजू शिंदे अपक्ष उभे असताना 43 हजार 347 मते मिळाली होती. तर संजय शिरसाट यांना 83,792 मते मिळाली होती. 40 हजार मतांनी संजय शिरसाट यांचा विजय झाला होता.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्चिम संभाजीनगर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार राजू शिंदेंनी केलाय. त्यातच ठाकरेंनी आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांना सोबत घेत त्या मतदारसंघातील दलित मतं पारड्यात पाडून घेण्यासाठी आखणी केलीय. त्यामुळेच राजू शिंदेंचं ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणं संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे.
वातावरण सकारात्मक असतानाही लोकसभा लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भाजपने येथे मेहनतीने काम करुनही ही जागा शिंदे गटाला दिली गेली.मी 1995 पासून भाजपसाठी काम करतोय. पण यावेळी महायुतीमुळे शिंदे गटासाठी काम केलं.आम्ही त्यांचे काम केले. पण त्यांनी साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. शिंदे गट आमचा वापर करून घेत आहे, अशा शब्दात राजू शिंदेंनी महायुतीत असतानाही टीकास्त्र सोडलं होतं. आता तर ठाकरे गटात गेल्यानं राजू शिंदेंचं आक्रमक रुप पहायला मिळेल.
दुसरीकडे राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे भाजपला मोठा फटका बसेल यात शंका नाही. राजू शिंदेंनी भाजप सोडू नये म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्वतंत्र चर्चा केली.
पण तरीही ते पक्षांतरावर ठाम राहिले.
हे ही वाचा : Worli Accident : "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं?
दरम्यान 6 नगरसेवक, दोन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी सोबत असल्याचं राजू शिंदेंचा दावा आहे. आधी हरिभाऊ बागडे आणि नंतर अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राजू शिंदेंनी थेट भाजपवरही नाराजी व्यक्त केलीय. भाजप नेते अजूनही चूका मान्य करायला तयार नाहीत.आमच्या मागण्यांवर ठोस आश्वासन द्यायला तयार नाहीत. मी आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर इथपर्यंत आलोय,अशा शब्दात शिंदेंनी भाजप नेत्यांविषयीची खंत व्यक्त केली आहे.
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे सांगत नेते राजू शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गेले आहेत.आता राजू शिंदेंच्या येण्याने ठाकरे गटही मजबूत होणार आहे. एकप्रकारे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंसह भाजपच्या तरुण चेहरा असणाऱ्या राजू शिंदेंना सोबत घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरुवात केली आहे.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदिप जैस्वाल, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, पैठणचे आमदार जे आता खासदार झालेत ते संदिपान भुमरे या सर्वांमुळे संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढलीय. त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिंदे गटाला रोखण्यासाठी ठाकरेंनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय. याशिवाय अतुल सावेंच्या माध्यमातून भाजप मजबूत करण्याच्या फडणवीसांच्या इराद्यांना ब्रेक लावण्याचा प्रयत्नही केलाय. आता उद्धव ठाकरेंना यात कितपत यश मिळतं ते विधानसभा निकालानंतरच कळेल.
ADVERTISEMENT