Praful Patel Wealth: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी असलेल्या खासदारकीचा राजीनाम देत जवळपास दोन वर्षांत दुसऱ्यांदा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्यानं प्रफुल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार आहेत. पण, याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रफुल पटेल यांची नेमकी किती संपत्ती आहे हे आता समोर आलं आहे. तर जाणून घेऊयात प्रफुल पटेल हे किती कोटींचे मालक आहेत? (rajya sabha election 2024 ajit pawar ncp leader praful patel wealth worth 450 crores)
ADVERTISEMENT
राज्यसभेसाठी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी प्रफुल पटेल सर्वाधिक श्रीमंत आहेत. प्रफुल पटेल यांची जवळपास दीड वर्षांपूर्वी 400 कोटींच्या घरात संपत्ती होती. ती वाढून आता साडेचारशे कोटी रुपये झाली आहे. त्यांच्याकडील ही एकूण मालमत्ता स्थावर आणि जंगम या स्वरुपात आहे.
प्रफुल पटेलांकडे नेमकी संपत्ती आहे तरी किती?
प्रफुल पटेल यांच्याकडे 39 हजार, तर त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 41 हजार आणि कुटुंबाकडे 1 लाख रुपये रोख रक्कम असल्याचं त्यांनी निवडणूक शपथपत्रात म्हटलं आहे.
याशिवाय पटेलांकडे 37 लाख 25 हजार, त्यांच्या पत्नीकडे 37 लाख 14 हजार, तर कुटुंबाकडे 76 लाख 32 हजार रुपये बँक डिपॉजिट आहे. शेअर्स पाहिले, तर पटेलांकडे 2 कोटी 79 लाख, त्यांच्या पत्नीचे 3 कोटी 53 लाख 92 हजार, कुटुंबाचे 9 कोटी 84 लाख 54 हजार रुपयांचे शेअर्स आहेत.
प्रफुल पटेल यांनी दुसऱ्यांना काही कर्जाऊ रक्कम दिली आहे. त्यांना 13 कोटी 13 लाख 21 हजार रुपये, त्यांच्या पत्नीला 33 कोटी 15 लाख 45 हजार रुपये, तर कुटुंबाला 76 कोटी 36 लाख 51 हजार रुपये देणी दुसऱ्यांकडून येणं बाकी आहे.
हे ही वाचा>> Fadnavis : "उद्धव ठाकरेंसोबत आता युती नाहीच, कारण..."
पटेल कुटुंबाचे दागदागिने पाहिले तर त्यांच्याकडे 1 कोटी 87 लाख, पत्नीकडे 7 कोटी 5 लाखांचे दागिने आहेत. ही सगळी रक्कम मिळून प्रफुल पटेल आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण जंगम मालमत्ता दीडशे कोटींच्या घरात आहे.
प्रफुल पटेल यांची स्थावर मालमत्ता पाहिली तर त्यांच्याकडे गोंदियामध्ये एक एकर शेतजमीन असून त्याची किंमत 1 लाख 70 हजार रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीची 3 एकर शेतजमीन असून त्याची किंमत 5 कोटी 58 लाख रुपये आहे.
पटेलांची कुठलीही व्यावसायिक इमारत नसून त्यांच्या पत्नीच्या नावावर वरळीत सीजे हाऊसमध्ये व्यावसायिक इमारत आहे. कुटुंबाच्या नावाने सीजे हाऊसमध्ये कार्यालय असून त्याची किंमत 71 कोटी 42 लाख रुपये आहे. प्रफुल पटेल यांचं 34 लाख रुपयांचं, त्यांच्या पत्नीचं 85 लाख रुपये, तर त्यांच्या कुटुंबाच्या नावानं 18 लाख रुपयांचं गुजरातमध्ये घर आहे.
वरळीतील सीजे हाऊसमध्ये पटेलांच्या नावानं एक मजला असून त्याची किंमत 21 कोटी 21 लाख, तर त्यांच्या पत्नीच्या नावानं असलेल्या मजल्याची किंमत 10 कोटी 76 लाख रुपये असून त्यांच्या कुटुंबाच्या नावानं उर्वशी अपार्टमध्ये फ्लॅट असून त्याची किंमत 21 कोटी 75 लाख रुपये आहे. 78 कोटी 20 लाख रुपयांचे दोन मजले ईडीने ताब्यात घेतले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या नावानं नागपुरात एक घर असून त्याची किंमत 11 कोटी 72 लाख रुपये आहे.
हे ही वाचा>> अजित पवार झाले भावूक; म्हणाले, "मला एकटं पाडण्याचा..."
मुंबईतील एका इमारतीमध्ये त्यांचे काही शेअर असून त्याची किंमत साडेपाच लाख रुपये, तर त्यांच्या पत्नीच्या नावानं दोन लाख रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ही 300 कोटींच्या घरात आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता दोन्ही मिळून प्रफुल पटेल यांच्याकडे एकूण 450 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. महत्वाचं म्हणजे साडेचारशे कोटींची संपत्ती असून देखील पटेलांच्या नावावर कुठलीही कार किंवा गाडी नाही.
नुकताच राज्यसभेसाठी अर्ज भरताना प्रफुल पटेल यांनी त्यांची नेमकी किती संपत्ती आहे हे शपथपत्रात नमूद केलं आहे.
ADVERTISEMENT