Maharashtra Political Crisis in Supreme court : महाराष्ट्राच्या आणि दिल्लीतील सरकारच्या नजरा सध्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने निकाल राखून ठेवलेला आहे. हा निकाल मे महिन्याच्या मध्यावधीच्या आधी लागण्याची अंदाज व्यक्त केली जात आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी मोठं भाकित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार 15 दिवसांत कोसळणार, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, तसेच राज्यपालांनी दिलेले सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि इतर मुद्द्यांवरील याचिकांवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाच्या निकालाचीच प्रतिक्षा असून, शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी शिंदेंचं सरकार कोसळणार असं राजकीय भाकित केलं आहे.
हेही वाचा >> मोदींचा मौनी बाबा का झाला? त्यांच्या जिभेला…; संजय राऊतांचं वर्मावर बोट
उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होत आहे. या सभेच्या अनुषंगाने राऊत पाचोऱ्यात असून येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा असून, 24 ते 28 एप्रिलपर्यंत निर्णय येऊ शकतो अशी चर्चा आहे, असा मुद्दा संजय राऊतांसमोर उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही वाट पाहतोय आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे.”
ठाकरेंची साथ सोडलेल्या आमदारांसाठी पक्षाची दारं बंद
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असं म्हटलं आहे की, पुन्हा महाविकास आघाडी सरकार येईन आणि जे आमदार गेले आहेत, ते परत येतील. या मुद्द्यावर भाष्य करताना राऊतांनी सांगितलं की, “येऊ शकतात. पण, जे निघून गेले त्यांना परत शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही. जे गेले, ते गेले. वो अब भगवान को प्यारे हो गये.”
15 ते 20 दिवसांत सरकार गडगडणार -संजय राऊत
एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं आहे की, अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात. खडसे यांच्या या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “बघा, प्रत्येकजण आपापली गणितं मांडत आहे. आम्ही निकालाची वाट पाहतोय. पण, सध्या जे मुख्यमंत्री आणि त्याचं 40 लोकांचं राज्य आहे. ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
पुष्पचक्र अर्पण करा, संजय राऊत शिंदे सरकारबद्दल काय बोलले?
“मी मागे एकदा सांगितलं होतं की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल. पण, न्यायालयाचा निकालच उशीरा लागतोय, पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्युलेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही आणि कुणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. पुष्पचक्र अर्पण करा”, असं भाकित संजय राऊत यांनी केलं.
ADVERTISEMENT