Maharashtra Politics, Sharad Pawar And Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जून रोजी कन्या सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आणि पक्षातील (NCP) नेत्यांच्या वर्चस्व वादाला नवे वळण मिळाले. सुप्रिया सुळे याच पवारांच्या राजकीय उत्तराधिकारी असतील हेच यानिमित्ताने स्पष्ट झालं. पण, सगळ्यांच्या नजरा त्यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे आहेत. अजित यांनी त्यांच्या चुलत बहीण असलेल्या सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये क्रमांक दोनच्या पदावर झालेल्या नियुक्तीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळले. अजित पवार इतकेच म्हणाले की, “मी खूप समाधानी आहे. जे कयास लावले जात आहेत, ते अनावश्यक आहेत.” अजित पवारांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विटही केले.
ADVERTISEMENT
2 मे रोजी शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याची घोषणा करून राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थकांना आश्चर्यचकित केले. त्यावेळी, त्यांचे पुतणे असलेले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील एक गट महाराष्ट्र विकास आघाडीशी (एमव्हीए) संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करण्यास आतुर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि अजित पवार यांना त्यांची जागा दाखवावी या उद्देशाने पवारांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले गेले. पवारांच्या घोषणेचा उद्देश पूर्ण झाला. निराशा आणि नैराश्याच्या आक्रोशात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनीही शरद पवारांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्यामुळे पवार आणखी शक्तिशाली म्हणून वर आले आणि त्यांनी 5 मे रोजी आपला निर्णय मागे घेतला.
भाजपशी हातमिळवणी अन्…
अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे वृत्त नाकारले. पण, तरीही अनेक प्रकरणांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एक गटाच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे. अजित पवार हे भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते.
हेही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचेही बोलले जात होते. विशेष म्हणजे, पवारांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या नवीन आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे अजित हे एकमेव राष्ट्रवादी नेते होते. त्याचबरोबर पवारांना पदावर कायम राहण्याची विनंती करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी खडसावले होते. त्यामुळे ते एकटे पडल्याचे दिसून आले. पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केलेल्या पत्रकार परिषदेलाही अजित पवार अनुपस्थित होते.
शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे…
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी सुळे यांची नियुक्ती अपेक्षित असताना पटेल यांच्या नियुक्तीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पक्षातील दोन प्रतिस्पर्धी गटांमधील हितसंबंधांचा समतोल राखण्यासाठी दोघांना कार्याध्यक्ष बनवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापैकी एक गट शरद पवारांशी एकनिष्ठ आहे आणि दुसरा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जवळ येत होता. पटेल हे दुसऱ्या गटातील मानले जातात. सुळे यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या राज्यांमध्ये अजित पवारांचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्राचा समावेश आहे.
हेही वाचा >> रक्ताचं नातं असून साताऱ्याचे दोन्ही राजे सारखे का भिडतात? इतिहासातच आहे उत्तर!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक मंडळाच्या अध्यक्षपदीही सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या निवडीत त्यांचा शब्द वरचा असणार आहे.
मात्र, अजित पवार यांच्याशी चर्चा करून सुळे आणि पटेल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितलं की, “त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. त्यांचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे, कारण त्यांची महत्त्वाकांक्षा अखेरीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची आहे.”
अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने काय सांगितलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या जवळच्या एका नेत्याने सांगितले की, “नेतृत्वात बदल झाला तरी, सुत्रे अजितदादांच्या हातात राहील. या निर्णयामुळे पवार साहेबांचे वारसदार म्हणून सुप्रिया ताईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी महाराष्ट्रात अजितदादांना महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणाचे बारकावे माहिती आहेत. तसेच त्यांच्याकडे बघितले जाते. दादांच्या स्थानाला कुणी हातही लावू शकत नाही, असं झालं तर पक्षाला धक्का बसेल.”
हेही वाचा >> Lok Sabha Election : मोदी-शाहांचा आता यांच्यावर ‘डोळा’! काय आहे स्ट्रॅटजी?
राष्ट्रवादीचा भक्कम पाया असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, ही ताजी चाल अजित पवारांना दूर करण्याचा प्रयत्न होता. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक ज्येष्ठ नेते म्हणतात, “अजित पवारांना आता माहीत आहे की, जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त राष्ट्रवादीच मदत करू शकते. भाजपसोबत जाऊन त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही.”
सुप्रिया सुळेंच्या निवडीबद्दल पवारांच्या निकटवर्तीय नेत्याने काय सांगितलं?
पवार यांच्या कुटुंबाशी प्रदीर्घ काळापासून संबंध असलेल्या एका सहकाऱ्याने सांगितले की, शरद पवार हे मागील बऱ्याच वर्षांपासून सुप्रिया सुळे यांना तयार करत होते. तशी काळजी त्यांच्याकडून घेतली जात होती. ते म्हणाले, “2019 मध्ये अजित पवारांनी बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हाच शरद पवार यांनी निर्णायक पाऊल उचलले होते. त्यांनी आपली ताकद एकवटली आणि तीन दिवसांत अजित पवार यांना राजीनामा देण्यास भाग पाडून राष्ट्रवादीत आपले वर्चस्व सिद्ध केले.”
सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीचा अर्थ काय?
सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीकडे ग्रामीण भागातील पक्षाला मवाळ, शहरी प्रतिमा देण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. प्रफुल्ल पटेल हे दिल्लीतील कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर विविध पक्षांशी नेटवर्किंगसाठी देखील ओळखले जातात.
मात्र, सुळे आणि पटेल यांच्या नियुक्तीमुळे पक्षांतर्गत तेढ वाढेल, असा दावा राष्ट्रवादीच्या विरोधकांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांचा असा दावा आहे की, “राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील फूट वाढू शकते. पटेल आणि अजित पवार यांना पक्षापासून फारकत घेऊन भाजपसोबत जायचे आहे, अशी अटकळ होती. शरद पवार आता पटेलांना आपल्या बाजूला करून अजित पवारांनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब
सुप्रियांच्या नियुक्तीमुळे साहजिकच ‘घराणेशाही’चा आरोपही झाला. त्याला उत्तर देताना सुळे म्हणाल्या की, “मला मान्य आहे. घराणेशाही (एकाच कुटुंबाची मक्तेदारी) आहे. मी (या आरोपापासून) पळून कसे जाऊ शकते.” तथापि, त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी “गुणवत्तेच्या” आधारावर कामगिरी करून खासदार म्हणून आपली योग्यता सिद्ध केली आहे. सुळे या पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघामधून तीनवेळा लोकसभेवर निवडून आल्या असून, त्यांनी एक टर्म राज्यसभेवरही काम केले आहे. सुळेंना पक्षाच्या पदानुक्रमातील त्यांच्या स्थानाबद्दलही स्पष्ट कल्पना होती. “राष्ट्रीय स्तरावर मी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना अहवाल देईन. राज्यात अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना.” अजित यांना बाजूला केले जात आहे का? असे विचारले असता त्यांनी असंही म्हटलं होतं की, “हे खरे नाही… ते विरोधी पक्षनेते आहेत. हे पद मुख्यमंत्री पदाच्या समकक्ष आहे.”
ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात, “अजित पवार काय करणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सुळे कार्याध्यक्ष असल्या तरी महाराष्ट्रातील पक्षाचा कारभार अजित पवारच चालवणार यात शंका नाही.”
अजित पवार : आतापर्यंतचा राजकीय प्रवास
– अजित पवार (63 वर्षे) यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी शरद पवार यांचे थोरले बंधू अनंतराव पवार आणि आशाताई यांच्या पोटी झाला.
– सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला
– 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले; काही महिन्यांनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री झालेले काका शरद पवार यांच्यासाठी ही जागा रिकामी झाली.
– 1999 मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी पाणी, ऊर्जा आणि वित्त यांसारखी खाती सांभाळली. 2010-2014 या काळात ते उपमुख्यमंत्री होते.
– 2006 मध्ये चुलत बहीण सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते.
– त्यांनी 2019 मध्ये भाजपसोबत काही दिवसांसाठी सरकार स्थापन केले. जेव्हा एमव्हीए सरकार स्थापन झाले तेव्हा अजित पवार यांना अर्थ मंत्रालयासह उपमुख्यमंत्री करण्यात आले.
ADVERTISEMENT